सद्यस्थिती व निधीबाबत माहिती घेऊन, उर्वरित दवाखाने तातडीने सुरू करण्याचे दिले निर्देश
पुणे, दि. १३ – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ प्रकल्पाची सविस्तर आढावा बैठक (Review meeting of ‘Aapla Dawakhana’ project under the guidance of Vice Chairman Dr. Neelam Gorhe) विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. सद्यस्थितीचा व निधीच्या उपलब्धतेचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी मंजूर ९१ दवाखान्यांपैकी, ( Out of the 91 dispensaries approved for Pune and Pimpri-Chinchwad Municipal Corporations,) सध्या पुणे महापालिकेअंतर्गत ८ आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत ७ दवाखाने कार्यान्वित आहेत. उर्वरित दवाखाने तातडीने सुरू करण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिले.
या बैठकीस आरोग्य विभागाचे डॉ. स्वनील लाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, पुणे महानगरपालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक, सहायक संचालक डॉ. दिप्ती देशमुख आदी अधिकारी उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘आपला दवाखाना’ ही योजना राज्यातील गोरगरीब जनतेसाठी शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागांवर दवाखाने सुरू करताना भाडे निधीचा वापर जागेच्या डागडुजीसह आवश्यक यंत्रसामग्री, औषधे खरेदीसाठी करता येईल, यासाठी प्रस्ताव त्वरीत सादर करावेत. प्रस्ताव मंजूर होईपर्यंत दवाखाने सुरू करण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी केली.
तसेच, नागरिकांना अडचण होऊ नये यासाठी इन्वर्टर, डास प्रतिबंधक जाळ्या, आवश्यक उपकरणे तातडीने उपलब्ध करून द्यावीत. झोपडपट्टी भागांमध्ये पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी योग्य ठिकाणी दवाखाने स्थापन करून जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक बांधकाम व डागडुजी करावी, असेही त्यांनी सांगितले. बैठकीदरम्यान डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. यावर मंत्री महोदयांनी या संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा अशा सूचना आरोग्य संचालकांना दिल्या.
महानगरपालिकेने प्रत्येक ठिकाणी भेट देऊन वस्तुस्थितीची माहिती द्यावी, आणि नागरिकांचा विरोध असल्यास जनसुनावणी घेऊन जागा निश्चित करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२५ मेपासून ‘आपला दवाखाना’ केंद्रांमध्ये आरोग्य विभाग, महापालिका व सामाजिक संस्थांच्या समन्वयाने आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असून, या शिबिरांमध्ये महिलांची रक्त तपासणी, कॅल्शियम व लोहाच्या कमतरतेची चाचणी, औषध वितरण यावर भर दिला जाणार आहे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी स्पष्ट केले.