मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आयबीएममार्फत
ए.आय. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व आयबीएम यांच्यात सामंजस्य करार
पिंपरी, दि. १३ मे – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील अमेरिकेत मुख्यालय असणारी जगप्रसिद्ध कंपनी आयबीएम व यशस्वी स्किल्स लिमिटेड यांच्यात रोजगाराभिमुख अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी नुकताच सामंजस्य करार संपन्न झाला. (Open University students will get it through IBM) या करारामुळे मुक्त विद्यापीठाच्या लाखो विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणाबरोबरच रोजगाराभिमुख संगणकीय कौशल्य आधारित शिक्षण मिळणार आहे.
या करारानुसार मुक्त विद्यापीठाच्या पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग,सायबर सिक्युरिटी, ब्लॉक चेन, डेटा एनॅलिटीक्स अशा विविध आधुनिक तंत्रज्ञानासंदर्भात
प्रशिक्षण देण्यात येणार असून. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयबीएम या जगद्विख्यात कंपनीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या सामंजस्य कराराप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे व आयबीएम कंपनीच्या भारतातील आयबीएम इनोव्हेशन सेंटर फॉर एज्युकेशन सल्लागार व प्रमुख
संजीव मेहता, पुण्यातील यशस्वी स्किल्स लिमिटेडचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या सामंजस्य करारानुसार मुक्त विद्यापीठाच्या पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम असेल. ज्यामध्ये पहिल्या वर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, ब्लॉक चेन अशा दहा इमर्जिंग टेक्नॉलॉजीबद्दलचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येईल. दुसऱ्या वर्षात या इमर्जिंग टेक्नॉलॉजीच्या प्रत्यक्ष वापरावर भर दिला जाईल,तसेच विविध विद्याशाखांमध्ये ए. आय. चा वापर कसा करावा यादृष्टीने ए.आय इन आर्ट्स, ए.आय इन कॉमर्स किंवा ए.आय इन मॅनेजमेंट असे अभ्यासक्रम असतील.तर तिसऱ्या वर्षी या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना लाईव्ह प्रोजेक्टद्वारे प्रशिक्षण दिले जाईल. प्रती वर्ष साठ तासांचे या प्रशिक्षणासाठी ४ श्रेयांक (क्रेडिट) देण्यात येतील.
याशिवाय मुक्त विद्यापीठातून पदवी शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या व पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठीदेखील आयबीएमने साठ तासांचा एक स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला आहे.
आयबीएम सोबतच्या या प्रशिक्षणामुळे मुक्त विद्यापीठातील विद्यार्थी अधिक उत्तम प्रकारे रोजगारक्षम बनतील. तसेच सध्या सर्व क्षेत्रांमध्ये वेगाने प्रवेश करणाऱ्या या इमर्जिंग टेक्नॉलॉजीमुळे बदलणाऱ्या नवीन कार्यप्रणालीशी जुळवून घेणे या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना अधिक सोपे होईल, अशा प्रकारच्या इमर्जिंग टेक्नॉलॉजीसाठी विदयापीठस्तरावर सामंजस्य करार होण्याचा हा राज्यातला पहिलाच प्रयत्न आहे, या करारामुळे “ज्ञानगंगा घरोघरी” हे मुक्त विद्यापिठाचे ब्रीद वाक्य अधिक जोरकसपणे अधोरेखित होईल, बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध व्हावे, स्पर्धेच्या युगात मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थीसुद्धा अग्रेसर व्हावा या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला, असे मत यावेळी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांनी व्यक्त केले.
विद्यापीठातून बीए आणि बीकॉमसह पारंपारिक शिक्षण घेणारे लाखो विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे रोजगाराभिमुख शिक्षण आणि शिक्षणानंतर चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
– प्रा. संजीव सोनावणे, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाबरोबर शैक्षणिक सामंजस्य करार केल्यामुळे आयबीएम कंपनीस तळागाळातील,आर्थिक दुर्बल घटकातील मोठ्या जनसमुदायाशी जोडले जाण्याची संधी मिळाली आहे.
– संजीव मेहता, सलागार व प्रमुख आयबीएन इनोव्हेशन सेंटर फॉर एज्युकेशन.