नियोजनबद्ध शहरांसाठी निर्णयकर्ते, वास्तुकलातज्ज्ञांनी एकत्र यावे

नियोजनबद्ध शहरांसाठी निर्णयकर्ते, वास्तुकलातज्ज्ञांनी एकत्र यावे

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे मत; व्हीके ग्रुप आयोजित तीन दिवसीय ‘व्हीकलेक्टिव्ह’ प्रदर्शनाचा समारोप

पुणे: “नागरीकरणाचा वेग येत्या काळातही मोठाच असेल. त्यामुळे आपली शहरे सुनियोजित आणि सुंदर असणे आवश्यक आहे. त्यासाठी निर्णयकर्ते राजकीय नेते आणि वास्तुकलातज्ज्ञ यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे,” असे मत असे राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. आधुनिक काळात आपल्याला हरित इमारतींची (ग्रीन बिल्डिंग) अधिक आवश्यकता असून, त्या निर्माण होण्याचा आग्रह वास्तुकला तज्ज्ञांनी धरायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
आर्किटेक्चर, एन्व्हायर्नमेंट, इंटेरियर डिझाईन, टाऊन प्लॅनिंग व अर्बन डिझाईन क्षेत्रात कार्यरत पुण्यातील व्हीके ग्रुपच्या वतीने ५१ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ‘व्हीकलेक्टिव्ह-बिल्डिंग द सिटी वि कॉल होम’ या तीन दिवसीय प्रदर्शनाच्या समारोपावेळी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी बोलत होत्या. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, व्हीके ग्रुपचे संस्थापक विश्वास कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक ऋषिकेश कुलकर्णी, संचालक विजय साने, संचालिका अनघा परांजपे-पुरोहित, अपूर्वा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे माजी व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ‘पुण्याच्या शाश्वत विकासात मेट्रोचे योगदान’ यावर, तर स्मार्ट सिटी मिशनचे सहसचिव कुणाल कुमार यांनी ‘स्मार्ट सिटीज मिशन: यश आणि भविष्यातील दिशा’ यावर आपले विचार मांडले.

 
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “आपल्याकडे वास्तुकलांच्या संदर्भात बोलताना प्राचीन आणि ऐतिहासिक काळाविषयी बोलावे लागते. मधल्या काळातील वास्तुंसंदर्भात फार चर्चा होत नाही. मात्र, आता पुन्हा एकदा वास्तुकला बहरत आहे. यामध्ये व्हीके ग्रुपसारख्या दीर्घ परंपरा असणाऱ्या संस्थांचे मोलाचे योगदान आहे. आपल्या इमारती, विमानतळ, रुग्णालये, शैक्षणिक संकुले, निवासी प्रकल्प, व्यावसायिक संकुले, रस्ते अशा अनेक ठिकाणे अधिक नियोजित आणि सुंदर करण्याची आवश्यकता आहे. तंत्रस्नेही काळात नवी तंत्रमाध्यमे वापरून वास्तुकलातज्ञांनी शहरांच्या नियोजनात योगदान द्यावे.”

राज्यातील गोसेवा आयोगाची रचना आणि कार्यपद्धतीचा आढावा घेत शेखर मुंदडा म्हणाले, “देशातील १० राज्यांत गोसेवा आयोग असून, महाराष्ट्राचा आयोग त्यात अग्रेसर आहे. गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आयोगामार्फत प्रत्येक देशी गोवंशीय गाईला प्रति महिना दीड हजारांचे, तर प्रत्येक तालुक्याला गोशाळेसाठी ५ लाखांचे अनुदान दिले जाते. राज्यात गोसाक्षरता निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी गो पर्यटनाचा पर्याय विचाराधीन आहे. वास्तुकलातज्ञांनी आता गृहप्रकल्पांमध्ये ‘गोपार्क’चा पर्याय द्यावा.”

ब्रिजेश दीक्षित म्हणाले, “पुण्यात मेट्रोचे काम करताना समस्या आल्या, आव्हाने उभी राहिली. मात्र, त्यातून मार्ग काढीत मेट्रो आता धावायला लागली. ३५ किलोमीटरच्या आहेत दोन मार्गिका शहराचा ३० टक्के भाग जोडतात. हिंजवडी-शिवाजीनगरचा निर्णयही झाला, असून शहरात मेट्रो मार्गिकांचा विस्तार करण्याचे नियोजन सुरु आहे. मेट्रो लोकलप्रमाणे पुणे मेट्रोचाही आगामी काळात मोठा वापर होणार आहे. शहरातील वाढते अपघात, कोंडी रोखण्यास मोठी मदत होणार आहे.”
कुणाल कुमार म्हणाले, “सतत वाढत जाणाऱ्या पुण्यात वाढती वाहने, त्यांच्यासाठी रस्ता, पादचाऱ्यांचा सुरक्षित प्रवास अशी आव्हाने आहेत. पादचाऱ्यांना रस्त्याने सुरक्षित प्रवास करता आला पाहिजे. पायाभूत सुविधा, नोकऱ्या उपलब्ध करायला हव्यात. सर्वाना कुठेही काम करण्याचे स्वातंत्र्य मिळावे. शहराला स्मार्ट सिटी कारायचे असेल, तर अर्बन (शहरी) भागाचा विकास गरजेचा आहे. चांगल्या प्रकारचा पाण्याचा पुरवठा व्हायला हवा. पीएमपीएमएलची सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारणे आवश्यक आहे, तसे झाले तर पुणे शहराला स्मार्ट सिटी होण्यापासून कोणीही रोखणार नाही.”
 
या प्रदर्शनाला पुणे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर, महेंद्रा लाइफस्पेसेसचे सीइओ अमित सिन्हा, बिझनेस हेड विमलेंद्र सिंघ यांच्यासह इतर अनेक मान्यवरांनी भेट देऊन कौतुक केले. मीनल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रक्षा कपले यांनी आभार मानले.
—————-
पुण्याची संस्कृती, वारश्यावर चर्चा
पुण्याची संस्कृती जोपासण्याचे काम अगदी वैयक्तिक पातळीवर पुण्यात होत असते. समिर बेलवलकर ह्यांचे मराठी मासिक ‘ऐसी अक्षरे’ ह्यातून मराठी वांग्मय लोकांपर्यंत पोचवायचे काम ते २१ वर्ष सातत्याने करत आहेत. तसेच, भारतरत्न पं. भिमसेन जोशी यांची नात यशोदा जोशीनी सांगितले की, पुण्यात ७० वर्ष सवाई गंधर्व महोत्सव सुरू ठेवून शास्त्रिय संगितासाठी प्रेक्षक तयार केला आहे. पुणे अर्बन स्केचर्सच्या गायत्री गोडसे ह्यांनी सांगितले की पुण्यात अगदी सामान्य माणसाने सुद्धा हातात पेन- ब्रश घेऊन पुण्याच्या गल्ली-बोळात स्केचिंग करण्याचे काम त्यांनी केले आहे. वेस्ट्रन रूटस् चे जयेश परांजपे ह्यांनी पुण्यात सुरू केलेले फुड वॅाक ह्यातून १०० वर्ष जुने खाण्याच्या ठिकाणींची माहिती पुणेकरांना करून दिली व खाद्य संस्कृती काय आहे ह्याची पुणेकरांना परत ओळख करून दिली. अमुक-तमुक ह्या मराठी पॅाडकास्ट मधून मराठी भाषेतून अनेक विषय लोकांपर्यत मराठी तज्ञांकडून ऐकायला मिळतो आहे. पुण्याच्या सांस्कृतिक वारश्याचे, मराठी भाषेचे अश्या प्रकारे संवर्धन होते आहे. ह्या सर्व पुणेकरांनी पुण्याचा अभिमान ठेवून सगळ्यांनी आपापल्या आवडीच्या क्षेत्रात, कलेसाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *