छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट सर्वांसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक

छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट सर्वांसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्त’ संचालित पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजीतर्फे ‘ऑरा २०२५’ प्रदर्शन

पुणे: “आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट अतिशय सुरेख पद्धतीने उलगडला आहे. भवतालच्या टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक कलाकृती उभारून त्याचे प्रदर्शन चिथारण्याचा विद्यार्थ्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे,” असे प्रतिपादन नामवंत शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी भवताल समजून घेत नाविन्यपूर्ण, कलात्मक व शाश्वत विकासाच्या कल्पनांवर काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव मिळावा व वर्षभर त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक व्हावे, यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन संचालित पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजीतर्फे (इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन-पीआयएटी) आयोजित ‘ऑरा २०२५’ सजावट प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी अभिजित धोंडफळे बोलत होते. प्रदर्शनाचे हे २५ वे वर्ष असून, यंदा ‘छत्रपती शिवाजी महाराज जीवनपट’ संकल्पनेवर हे प्रदर्शन होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचे विविध पैलू, त्यांची धोरणे, शस्त्रास्त्रे, शासकीय लेख आणि इतर ऐतिहासिक गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. यासह प्रदर्शनामध्ये रेसिडेन्शल इंटिरिअर, कमर्शिअल इंटिरिअर व त्यामध्ये सिंगल लाईन व्यवस्थ्येपासून फर्निचरपर्यंतची व्यवस्था, हॉस्पिटल डिजाईन, विविध विषय घेऊन रेस्टोरंट डिझाईन, इलेक्ट्रॉनिक शोरूम, मोबाईल गॅलरीज, कलर शेमचे प्रकार, विविध विटांचे प्रकार पाहायला मिळतील.

टिळक रस्त्यावरील अभिनव महाविद्यालयाशेजारी निखिल प्राईड इमारतीत असलेल्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजीमध्ये हे प्रदर्शन १२ मार्चपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विनामूल्य खुले असणार आहे. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ‘पीआयएटी’चे प्राचार्य प्रा. अजित शिंदे, प्रा. मंदार दिवाणे, प्रा. पल्लवी पुरंदरे, प्रा. अनिकेत नायकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे जसे वर्णन केले आहे, तसेच या प्रदर्शनातूनही त्यांच्या स्वराज्याचा विशाल दृष्टिकोन दिसून येतो. शिवाजी महाराजांच्या कार्यशक्तीची आणि त्यांच्या आदर्शांची सखोल माहिती मिळते. त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करून समाजासाठी चांगले कार्य करण्याचा संदेश या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिला जात आहे. प्रदर्शन पाहताना असे वाटते की आपण शिवकाळातच प्रवेश केला आहे. मुलांनी या प्रदर्शनासाठी केलेली मेहनत आणि त्यांचे समर्पण यातून स्पष्टपणे दिसून येते, ऋत्विक कुलकर्णी यांनी नमूद केले.

प्रा. अजित शिंदे म्हणाले, “सूर्यदत्त इन्स्टिट्यूटच्या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी केलेले विवेचन खरोखरच प्रेरणादायी आहे. हे प्रदर्शन केवळ शिवाजी महाराजांच्या शौर्याचाच नव्हे, तर त्यांच्या कुशल शासनपद्धती, नीतिमत्ता आणि लोकहिताच्या कार्यांचाही आढावा घेते. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याने केलेली प्रगती आणि भारतीय इतिहासात त्यांनी ठेवलेला ठसा यावर प्रकाश टाकणारी हे प्रदर्शन खरोखरच स्तुत्य आहे.”

प्राचार्य अजित शिंदे यांनी प्रदर्शनाच्या आयोजनामागील भूमिका सांगत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन पल्लवी पुरंदरे, अनिकेत नाईकरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

मुलांनी भरविलेले हे प्रदर्शन अतिशय सुंदर आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दिसून येत आहे. पाठ्यक्रम शिकवण्याबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना स्वावलंबन, प्रात्यक्षिक अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. गेली २५ वर्षे मुलांच्या पुढाकारातून व कल्पकतेतून हे प्रदर्शन लोकांच्या पसंतीस उतरत आहे. यंदा मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट साकारला आहे. त्यासाठी त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. महाराजांचे विचार, त्यांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी यापुढेही काम करत राहावे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले व जिंकलेले किल्ले विद्यार्थ्यांनी साकारले आहेत. महाराजांचा कार्याचा विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास करून चांगल्या कलाकृती निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. समर्पण व सचोटीने काम करून समाजाला आदर्श ठरेल, असे काम विद्यार्थ्यांनी करावे.
– प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *