‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमात प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते सन्मान
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयपीएस) सुनील फुलारी यांना
कायदा सुव्यवस्था, राष्ट्रसेवेसाठी ‘सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान
पुणे: कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयपीएस) सुनील फुलारी यांना कायदा सुव्यवस्था, राष्ट्रसेवेसाठी ‘सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमधील बन्सीरत्न सभागृहात विद्यार्थ्यांसाठी आयोजित संवाद कार्यक्रमावेळी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते सुनील फुलारी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व संचालक, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, फार्मसी, फिजिओथेरपी, विधी, एमबीए, एमसीए, आणि इतर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याआधी सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार पोलीस आयुक्त विजयकुमार चौबे, पोलीस अधीक्षक संजय जाधव आदींना प्रदान करण्यात आला आहे.
सुनील फुलारी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय सेवा, सामाजिक विकास, कायदा सुव्यवस्था, नेतृत्व विकास करण्यासाठी भरीव योगदान देत आहेत. २०२५ मध्ये फुलारी यांना राष्ट्रपती पदक मिळाले आहे. त्याआधी पोलीस पदक राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाले होते. न्याय, सुरक्षा व कायद्याची अमलबजावणी करण्यात कुशल नेतृत्व, अथक परिश्रम याची पावती म्हणून या पुरस्काराकडे पाहता येईल. भारतीय ज्ञान परंपरेअंतर्गत फुलारी यांनी विद्यार्थ्यांशी विदेश संवाद साधला. भविष्य घडवण्यात स्वतःच्या भूमिकेवर विचार करायला हवा. केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या विकासासाठी योगदान देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. आपल्या दीर्घ पोलीस सेवेतून मिळवलेल्या अनुभवांचे कथन करत समाजाची प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना सुनील फुलारी यांनी शंकांचे समाधान केले. त्यांच्या महत्वपूर्ण व प्रात्यक्षिक मार्गदर्शनाने उपस्थित सर्वांनाच प्रेरणा मिळाली. फुलारी यांनी विद्यार्थ्यांना विचारशील राहण्यास, आपल्या उद्दिष्टांप्रती निष्ठावान राहण्यास आणि समाजाच्या विकासासाठी सक्रिय योगदान देण्यास प्रवृत्त केले. पोलिसिंग, कायदा व सुव्यवस्था, पोलीस व नागरिक यांच्यातील संबंध यावर त्यांनी प्रकाश टाकला. गुन्हे व त्याचे बदलते स्वरूप, तंत्रज्ञानाचा अतिरेक, सोशल मीडियाचा गैरवापर, सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण यावर त्यांनी भाष्य केले. कम्युनिटी पोलिसिंग, नागरिकांचा विश्वास, सोशल मीडियाचा योग्य वापर गरजेचा असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांच्या बाबतीत आपण अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये आनंद पाहायला मिळाला. निर्भयपणे त्यांनी फुलारी यांना अनेक प्रश्न विचारले. शंकांचे निरसन करून घेतले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “शिक्षण घेत असताना केवळ व्यक्तिगत विकासाचा विचार करू नये. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या व राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी करावा. आयुष्यातील प्रत्येक अनुभव आपल्याला समृद्ध होण्यासाठी उपयुक्त असतो. त्यामुळे प्रत्येक क्षण आपण जगला पाहिजे. शिस्तबद्ध, एकाग्रतेचे वातावरण राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन वेळेत मोबाईलच्या वापरापासून दूर राहायला हवे. शिक्षण हे सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रीय विकासासाठी एक प्रभावी साधन आहे. त्यामुळे एकाग्रतेने सर्वांगीण शिक्षण आत्मसात करायला हवे.”