प्रगत तंत्रज्ञान, विकसित अर्थव्यवस्थेमुळे ‘सीए’ना मोठ्या संधी: सीए अंकित राठी

प्रगत तंत्रज्ञान, विकसित अर्थव्यवस्थेमुळे ‘सीए’ना मोठ्या संधी: सीए अंकित राठी

 ‘आयसीएआय’च्या वतीने ‘भविष्यातील सनदी लेखापाल’वर चर्चासत्राचे आयोजन

पुणे: “प्रगत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव, वेगाने विकसित होत असलेली भारताची अर्थव्यवस्था, आर्थिक नियोजनातील सनदी लेखापालांचे योगदान यामुळे भविष्यात सनदी लेखापालांना अनेक संधी खुणावत आहेत. मोठ्या प्रमाणात सीएची संख्या भासणार आहे. सनदी लेखापालांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करीत नवनवी आव्हाने पेलावीत. तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सीए होण्यास प्राधान्य द्यावे,” असे मत ‘आयसीएआय’च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष सीए अंकित राठी यांनी व्यक्त केले.
 
दी इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या (डब्ल्यूआयआरसी) पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पुण्यातील सनदी लेखापाल, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवनात झालेल्या कार्यक्रमात ‘डब्ल्यूआयआरसी’चे सचिव सीए गौतम लाठ, खजिनदार सीए पिंकी केडिया, विकासा चेअरमन सीए पियुष चांडक, ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य सीए यशवंत कासार व सीए ऋता चितळे, आयसीएआय पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
 
नवनिर्वाचित विभागीय समिती सदस्य सीए रेखा धामणकर, सीए अभिषेक धामणे व सीए राजेश अग्रवाल, माजी अध्यक्ष सीए काशिनाथ पठारे आदी उपस्थित होते. यावेळी सीए मेघानंद डुंगरवाल व सीए शैलेश राठी यांनी ‘भविष्यातील सनदी लेखापाल: नव्या युगातील नवकल्पना व परिवर्तनाचा अंगीकार’ यावर सचित्र मार्गदर्शन केले.
 
सीए अंकित राठी म्हणाले, “स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षात भारताची अर्थव्यवस्था ३० ट्रिलियन डॉलरपर्यंत जाण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट गाठण्यात सनदी लेखापालांची भूमिका महत्वाची राहणार आहे. तंत्रज्ञानामुळे आर्थिक व्यवहारांतही आमूलाग्र बदल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन कार्यरत सीए, तसेच विद्यार्थ्यांसाठी ‘डब्ल्यूआयआरसी’च्या वतीने सतत नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजिले जात आहेत. ज्ञान संवर्धनासाठी कार्यशाळा, परिषद, चर्चासत्रे घेतली जात आहेत.”
 
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “रिजनल कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांनी आज ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेला भेट देऊन चर्चा केली. वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला अनुसरून कौन्सिल राबवत असलेल्या उपक्रमांविषयी त्यांनी माहिती दिली. तंत्रज्ञानामुळे बदलणाऱ्या आर्थिक तरतुदी, अभ्यासक्रमातील बदल याविषयी मार्गदर्शन केले.”
 
सीए अमृता कुलकर्णी यांनी स्वागत-प्रास्ताविकात पुणे शाखेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच ‘डब्ल्यूआयआरसी’ पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. सीए गौतम लाठ, सीए पिंकी केडिया, सीए पियुष चांडक, सीए यशवंत कासार, सीए ऋता चितळे यांनी आपले विचार मांडले. विद्यार्थिनी गेया शाह हिने सूत्रसंचालन केले व आभार मानले.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *