व्यावसायिक प्रगतीला सामाजिक कार्याची जोड द्यावी

व्यावसायिक प्रगतीला सामाजिक कार्याची जोड द्यावी

अजित गुलाबचंद यांचे प्रतिपादन; बिल्डर्स असोसिएशनतर्फे जेपी श्रॉफ यांना ‘निर्माणरत्न २०२३’ प्रदान
 
पुणे : “बांधकाम क्षेत्रात तंत्रज्ञानाचा, कलात्मकतेचा अंतर्भाव होत असल्याने दिवसेंदिवस बांधकामाची गुणवत्ता वाढली आहे. घरांच्या वाढत्या मागणीमुळे व्यावसायिक प्रगती वेगाने होत आहे. ही प्रगती साधतानाच सामाजिक जबाबदारीचेही भान जपायला हवे. चांगल्या शहरांच्या निर्माणासाठी सामाजिक कार्याची आणि सकारात्मक विचारांची जोड द्यायला हवी,” असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योगपती, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी केले.

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरतर्फे आयोजित आणि बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड प्रायोजित ‘बीएआय-शिर्के वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन २०२३’ या पुरस्कार वितरण सोहळ्यात अजित गुलाबचंद बोलत होते. हॉटेल शेरेटॉन ग्रँडमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ मुख्य अधिकारी आर. बी. सूर्यवंशी, उपाध्यक्ष (इंजिनिअरिंग प्लॅनींग अँड डिझाईन) वाय. पी. काजळे, उपाध्यक्ष (कंत्राट) बी. पी. कुलकर्णी, ‘बीएआय’ पश्चिमचे उपाध्यक्ष सुनील मुंदडा, ‘बीएआय’ महाराष्ट्रचे अध्यक्ष सचिन देशमुख, डब्ल्यूबीएससीचे अध्यक्ष हरप्रीत सिंग आनंद, बीएआय पुणे सेंटरचे अध्यक्ष डी. एस. चौधरी, उपाध्यक्ष व डब्ल्यूबीएससीचे संयोजक सुनील मते, मानद सचिव अजय गुजर, खजिनदार राजाराम हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘बीएआय’च्या इंजिनीअरिंग डायरीचे प्रकाशन करण्यात आले.

 
 
यंदा ‘बीएआय-पद्मश्री बी. जी. शिर्के लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड’ श्रॉफ उद्योग समूहाचे जयप्रकाश प्रवीणचंद्र उर्फ जेपी श्रॉफ यांना प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाख अकरा हजार रोख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी बांधकाम क्षेत्रातील विविध विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या कंपन्यांना सन्मानित करण्यात आले. एस्कॉन प्रोजेक्ट्सला निवासी श्रेणीत, रोहन बिल्डर्स हाऊसिंग कॉम्प्लेक्स आणि बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांना निवासी सोसायटी श्रेणी, रत्नरूप प्रोजेक्ट यांना व्यावसायिक इमारतीत दोन पुरस्कार, रतिलाल भगवानदास कन्स्ट्रक्शन आणि सुरज बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना औद्योगिक श्रेणी, टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड आणि अजवानी यांना इन्फ्रास्ट्रक्चर श्रेणी, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि शुभम एपिक प्रायव्हेट लिमिटेड यांना सरकारी प्रकल्प, मिलेनियम इंजिनियर्स अँड प्रायव्हेट लिमिटेड यांना वर्क अप टु बेअर शेल श्रेणीत दोन पुरस्कार, सुगम कन्स्ट्रक्शन यांना लँडस्केप (हॉर्टिकल्चर) या श्रेणीमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्मृतीचिन्ह, शाल, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

जेपी श्रॉफ म्हणाले, “बीएआयच्या वतीने गुलाबचंद यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होतो आहे. नव्वदीच्या दशकात बांधकाम क्षेत्रात एक छोटा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम सुरु केले. आज याचे उद्योग समूहात रूपांतर झाले आहे. माझ्या वाटचालीत घरच्यांचा सहभाग मोलाचा आहे. वर्ल्ड स्कीलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या निमित्ताने मला तरुणांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली.”

सचिन देशमुख म्हणाले, “बीएआय पुणे सेंटरचा आदर्श महाराष्ट्रातील इतर सेंटरने घ्यायला हवा. यातून बांधकाम विभागातील नावीन्यता सर्वांसमोर सिद्ध करता येते. काळ बदलतो, तसेच बांधकामातील सुधारणाही वाढत आहेत. बांधकामाचा दर्जा आज उंचीवर पोहोचला आहे. आज बांधकाम क्षेत्रातील उणीव भरून निघताना दिसत आहे.”

सुनील मुंदडा म्हणाले, “देशात बीएआयचे कार्य एकूण २२२ सेंटरमधून सुरु आहे. पुणे सेंटर अधिक मजबूत आणि वेगाने प्रगती करत आहे. बांधकाम विभागातील वाढत्या दर्जामुळे ‘रेरा’ अंतर्गत प्रकल्प सहजरित्या पूर्ण होत आहेत. शासनाचे प्रकल्पही उच्च दर्जाचे होताहेत, ही चांगली गोष्ट आहे.”

डी. एस. चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. स्वागत-प्रास्ताविक हरप्रीत सिंग आनंद यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रशांत देशमुख आणि संजय आपटे यांनी केले आणि आभार अजय गुजर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *