ई-प्लस व इव्हेंटालिस्ट यांच्यातर्फे ‘इंजिनिअस बँकिंग लीडरशिप समिट व आयकॉनिक लीडर्स अवॉर्ड्स’
राज्य सहकारी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा सहभाग; नवतंत्रज्ञान, केंद्रीय सहकार धोरणावर चर्चा
पुणे: “राज्य सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे जाळे खेड्यापाड्यांत विस्तारलेले आहे. ग्रामीण भागातील माणूस या बँकांशी जोडलेला असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होण्यास, तसेच देशाच्या आर्थिक विकासात सहकारी बँकांचे महत्वाचे योगदान आहे. या बँका सर्वसामान्यांना आर्थिक आधार देण्याचे काम करतात,” असे प्रतिपादन गोवा विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांनी केले.
ई-प्लस इंटेलेक्च्युअल मीडिया व इव्हेंटालिस्ट यांच्या वतीने राज्य सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकरीता ‘इंजिनिअस बँकिंग लीडरशिप समिट व आयकॉनिक लीडर्स अवॉर्ड्स’चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. पाच राज्य सहकारी बँक व १६ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ई-प्लस इंटेलेक्च्युअल मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाहीद सिद्दीकी, व्यवस्थापकीय संचालक सबिना इनामदार सिद्दीकी, संचालक प्रेषित देशमुख हे या कार्यक्रमाचे आयोजक होते.
या कार्यक्रमाला गोव्याचे सामाजिक न्याय मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार संकल्प आमोणकर, नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडियाचे (एनसीयुआय) अध्यक्ष दिलीप संघानी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांच्यासह देशभरातील राज्य व जिल्हा सहकारी बँकांचे चेअरमन, संचालक व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बँकांसाठी लागणारे तंत्रज्ञान, प्रणाली व सुरक्षेची उपकरणे पुरवणाऱ्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांचे सादरीकरण यावेळी केले.
सुभाष फळदेसाई म्हणाले, “केंद्रीय पातळीवर स्वतंत्र सहकार मंत्रालय सुरू झाल्यापासून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेचा सहकारी बँकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक झालेला आहे. त्यामुळे बदलत्या काळात सहकारी बँकांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करून आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता आणायला हवी. तसेच सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे.” प्रमोद कर्नाड, उल्हास फळदेसाई, दिलीप संघानी यांनी सहकारी बँकांचे महत्व विशद करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
झाहीद सिद्दीकी म्हणाले, “सहकारी बँकांचे महत्व प्रतिबिंबित करण्यासह बँकिंग प्रणाली, नवतंत्रज्ञान यावर चर्चा करण्याच्या उद्देशाने ही समिट महत्वपूर्ण होती. या बँक सर्वसामान्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सातत्याने कार्यरत असून, सहकार क्षेत्रात भरीव योगदान देत आहेत. त्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम आहे. या समिटला, तसेच पुरस्कार सोहळ्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे समाधान आहे.”