भाजपा हीच माझी ओळख आहे – रवींद्र चव्हाण
यावेळी मंत्रिमंडळात अनेक नविन प्रॉमिसिंग चेहऱ्यांना संधी देताना काही अनुभवी, मातब्बर नेत्यांना मात्र वगळण्यात आलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या २-३ दिवसांपासून नाराजीनाट्य सुरु आहे. याला भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी कुठलाही पक्ष याला अपवाद नाही. उदाहरणच सांगायचं झालं तर सुधीर मुनगंटीवार, संजय कुटे, छगन भुजबळ, तानाजी सावंत, नरेंद्र भोंडेकर अशी अनेक नावं सांगता येतील. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी एकसंध असणाऱ्या महायुतीमध्ये आता मंत्रिमंडळ आणि खातेवाटपावरून भूकंप होतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. परंतु या नाराजीनाट्याला अपवाद ठरले आहेत ते देवेंद्र फडणवीस यांचे राइट हँड म्हणून ओळखले जाणारे रविंद्र चव्हाण !
सरकारमधील असो किंवा पक्ष संघटनेच्या दृष्टीने, गेल्या काही वर्षांतील रविंद्र चव्हाण यांची कामगिरी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा जो ऐतिहासिक विजय झाला, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या खालोखाल रविंद्र चव्हाण यांचं योगदान आहे, अशी चर्चा झाली. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतीनेच भाजपमधील जी नावं चर्चेत होती, त्या नावांमध्ये रविंद्र चव्हाण यांचं नाव आघाडीवर होतं. मुख्यमंत्रीपदी फडणवीसच हे निश्चित झालं, तेव्हा फडणवीस यांच्या ‘सुपर कॅबिनेट’ मधील एक निश्चित नाव म्हणून रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण त्यांना मंत्रिमंडळात कोणतंही स्थान देण्यात आलेलं नाही आणि तरीही रविंद्र चव्हाण यांच्याकडून कुठल्याही प्रकारे नाराजीचा सूर उमटला नाही.
नागपूर येथील विधान भवन परिसर, भाजपा विधीमंडळ कार्यालय येथे अनेक मंत्री, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत रविंद्र चव्हाण अतिशय खेळीमेळीने वागत आहेत. विशेष म्हणजे एरवी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी सतत संपर्कात असणाऱ्या रविंद्र चव्हाण यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील कोणतीही नाराजी दिसून आली नाही. अतिशय शांततेत आधीचा बायो बदलून त्याजागी ‘MLA (आमदार), डोंबिवली शहर’ इतकंच बायो ठेवण्यात आलं आहे. त्यामुळेच त्यांची ही शांत, संयत भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.
छगन भुजबळ यांनी “मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का?” असं म्हणत मनातील खदखद उघडपणे बोलून दाखवली. सुधीर मुनगंटीवार “मी नाराज नाही” असं म्हणत असले तरीही नितीन गडकरी यांच्यासोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. डॉ. संजय कुटे यांनी सोशल मिडियावर भावनिक पोस्ट टाकत अपमान झाल्याची भावना अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे. शिवसेना नेते विजयबापू शिवतारे यांनी “अडीच वर्षांनी मंत्रीपद दिलं तरी ते घेणार नाही” अशी टोकाची भूमिका घेतली. नरेंद्र भोंडेकर यांनी तर शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तानाजी सावंत यांनी आपल्या फेसबुकच्या डीपिमधून धनुष्यबाण हे चिन्ह काढून टाकलं आहे. मात्र या सगळ्यात रविंद्र चव्हाण समर्थकांनी मात्र कोणतीही भूमिका न घेता शांत राहण्याची भूमिका उठून दिसते आहे.
नेत्यांसोबतच त्यांचे समर्थक देखील आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. ठिकठिकाणी आपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, निषेध आंदोलने केली जात आहेत. छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारत जोडे मारो आंदोलन केल्याचं देखील पाहायला मिळालं. कुटे यांच्या समर्थकांनी जाब विचारण्यासाठी फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी धडकण्याचा निर्धार केला. याउलट रवींद्र चव्हाण समर्थकांच्या मनात काहीशी नाराजी असली तरीही कुठलीही आक्रमक प्रतिक्रिया दिसली नाही. त्यामुळे स्वतःसोबतच समर्थकांची समजूत काढण्यात देखील रविंद्र चव्हाण यशस्वी झाल्याचं दिसतं.
सध्याच्या काळात पक्षनिष्ठा, तत्त्वनिष्ठा, समाजकारणाचं व्रत या गोष्टी दुर्मिळ होत असल्या तरीही आपल्या या भूमिकेतून चव्हाण यांनी आपण अपवाद असल्याचं दाखवून दिलं आहे. “भाजपा ही माझी ओळख आहे” हे चव्हाण यांचं विधान निवडणुकीच्या काळात चर्चेत आलं होतं, आता या भूमिकेतून हेच वाक्य अधोरेखित झालं आहे. “राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” असं भाजपची विचारधारा सांगते. सध्याच्या काळात संयम बाळगत रविंद्र चव्हाण यांनी आपण या विचारधारेचे बिनचूक पालन करत असल्याचे दाखवून दिले आहे.