दिव्यांग विद्यार्थ्यांना आनंद व सन्मान देणारा ‘जल्लोष’ कार्यक्रम
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्त’मध्ये दिव्यांग मुलांसाठी ‘जल्लोष २०२४’चे आयोजन
पुणे: “दिव्यांग विद्यार्थ्यांत कमालीची गुणवत्ता असते. त्यांना योग्य व्यासपीठ, संधी आणि प्रोत्साहन दिले, तर हे विद्यार्थी कौतुकास्पद कामगिरी करतात. सूर्यदत्त परिवारातील विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये आपुलकीचा स्नेहबंध निर्माण व्हावा, त्यांच्या मनात सामाजिक भावना व संवेदनशीलता रुजावी, यासाठी ‘जल्लोष’सारखे कार्यक्रम उपयुक्त ठरतात,” असे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत दिव्यांग मुलांसाठी ‘जल्लोष २०२४’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गुणी मुलांचे कौतुक करताना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया बोलत होते. प्रसंगी बालकल्याण संस्थेचे क्रीडा शिक्षक अशोक नांगरे, ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका शीला ओका, सामाजिक कार्यकर्त्या सीमा दाबके, ‘सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन पुरस्कार २०२४’च्या मानकरी प्रियंका दबडे आदी उपस्थित होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमात गाणी, नृत्याविष्कार, जादूचे प्रयोग, फुग्यांची उधळण आणि भरपूर खाऊ खात विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमधील बंन्सीरत्न सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे हे चौदावे वर्ष होते. दिव्यांग मुलांना मुख्य प्रवाहात सहभागी करून घेत त्यांचे जीवन अधिक सहज व सोपे करण्याचा उद्देश या कार्यक्रमाचा आहे. ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दिव्यांग बांधवाना स्वतः बनवलेले कागदी पंखे देऊन स्वागत केले. या कार्यक्रमात विविध १८ संस्थांचे ६०० विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले.
वैष्णवी जगताप (शिवछत्रपती पुरस्कार: सहाय्यक क्रीडा अधिकारी), चिंतामणी राऊत (कॉमनवेल्थ आतंरराष्ट्रीय स्पर्धा सुवर्णपदक), सुप्रिया गायकर (राष्ट्रीय फ्लोअर बॉल स्पर्धा सुवर्णपदक), अमित घारे (राष्ट्रीय स्पेशल ऑलिम्पिक व्हॉलीबॉल स्पर्धा सुवर्णपदक), अक्षय ठकार (राष्ट्रीय स्पेशल ऑलिम्पिक टेबल टेनिस स्पर्धा सुवर्णपदक), हर्ष बाबर (राष्ट्रीय स्पेशल ऑलिम्पिक लॉन टेनिस स्पर्धा सुवर्णपदक), साकेत देवचक्के (राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा सुवर्णपदक), पायल राजीव वसे (कर्णबधीर) व्हेरी स्पेशल आर्ट इंडिया चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक, सम्यक महेश कांबळे (कर्णबधीर) व्हेरी स्पेशल आर्ट इंडिया चित्रकला स्पर्धा द्वितीय क्रमांक, श्रावण राममूर्ती नायडू (ऑटिझम) व्हेरी स्पेशल आर्ट इंडिया चित्रकला स्पर्धा द्वितीय क्रमांक मिळाला.
सीमा दाबके म्हणाल्या, “नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी देणारे एक व्यासपीठ आहे. यामध्ये सर्वच मुले खूप उत्साहाने सहभागी होतात. दिव्यांगांना सामान्य विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांचे भावविश्व उलगडता येते.” प्राजक्ता पाटकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.