‘घे भरारी, करू मतदान भारी’ मतदान जागृती अभियान

‘घे भरारी, करू मतदान भारी’ मतदान जागृती अभियान

पुणे: विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी अधिकाधिक मतदान करावे, याबाबत जनजागृती करण्यासाठी लघु उद्योजकांच्या ‘घे भरारी’ समूहातर्फे ‘घे भरारी, करू मतदान भारी’ हे मतदान जागृती अभियान राबविण्यात आल्याची माहिती ‘घे भरारी’चे प्रमुख राहुल कुलकर्णी व नीलम उमराणी-एदलाबादकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ग्राहक पेठचे सूर्यकांत पाठक, ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र कुलकर्णी, ‘घे भरारी’च्या सदस्य केतकी जोशी व वैशाली जोगदंड उपस्थित होते.

राहुल कुलकर्णी म्हणाले, “महाराष्ट्राला स्थिर व शाश्वत विकासासाठी लोकाभिमुख सरकार निवडून देण्यासाठी शंभर टक्के मतदान व्हायला हवे. नियमित उद्योजकांची प्रदर्शने भरवून त्यांना सशक्त करणाऱ्या ‘घे भरारी’ आता एक उपक्रम घेऊन आले आहे. मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘तुम्ही करा मतदान, आम्ही तुमच्यासोबत करू चहापान’ ही योजना राबवित आहोत. यासाठी कोथरूडमध्ये ‘घे भरारी’ची बाणेर, कोथरूड, डेक्कन परिसरात २५ पेक्षा अधिक केंद्रे सज्ज झाली आहेत. मतदान करून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या केंद्रांवर सकाळी ११ वाजेपर्यंत मोफत चहापान व नाश्ता आणि ‘घे भरारी’च्या सदस्यांशी गप्पागोष्टी करता येतील. त्यातून एकमेकांची ओळख आणि नेटवर्किंग होण्यासही मदत होणार आहे.”

नीलम उमराणी-एदलाबादकर म्हणाल्या, “तुमचे एक मत लोकशाहीसाठी बळकटी आणणारे ठरणार आहे. त्यामुळे जास्तीतजास्त लोकांनी मतदानाचे हे पवित्र कार्य करावे. मतदान केल्याची आपल्या बोटावरची खूण दाखवा, चहा-नाश्ता ‘घे भरारी’तर्फे मोफत मिळवा, या माध्यमातून आम्ही मतदान करण्याला प्रोत्साहन देत आहोत. आमच्या ग्रुपवर सदस्य मतदान करण्याचे आवाहन करणारे व्हिडिओ प्रसारित करण्यात येणार आहेत. यातून जवळपास पाच ते सहा लाख लोकांपर्यंत ही जागृती अभियान पोहोचणार आहे. ‘घे भरारी’ हा लघु व्यावसायिकांना सक्षम करणारे एक व्यासपीठ आहे. आज या ग्रुपवर दोन लाखांहून अधिक सक्रिय सदस्य आहेत. पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई, कोल्हापूर आदी ठिकाणी प्रदर्शने भरवली जातात. ‘घे भरारी’ समूहाच्या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झालेली आहे.”

सूर्यकांत पाठक म्हणाले, “ग्राहक पेठ व ग्राहक पंचायतीतर्फेही सकाळी लवकर मतदान करणाऱ्यांना मोफत चहापानाची व्यवस्था केली आहे. ग्राहक पेठेच्या कट्ट्यावर बोटाची शाई दाखवून चहा, क्रीमरोल मोफत दिला जाणार आहे. अधिकाधिक मतदारांनी ग्राहकपेठेच्या कट्ट्यावर चहापानासाठी यावे. सकाळी ११ पर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.”

चहापान व नेटवर्किंगची काही केंद्रे:
* बॉबीन बुटीक, कर्वे रोड
* पराग भिडे, कुंकूलोळ सोसायटी
* पीएनपी क्रिएशन, शिक्षकनगर
* अबंध आर्ट्स, मारुती मंदिर, कर्वे रोड
* हॉटेल वृंदावन, कर्वे रोड
* फेअरडील कुरिअर, आनंदनगर
* किमया, नळस्टॉप चौक
* घे भरारी ऑफिस, एमआयटी कॉलेज
* हॉटेल गुडलक, डेक्कन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *