चिपळुण: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात संरक्षक भिंत खचल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबईत असलेले चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी तातडीने मुंबईवरून परत येताच घटनास्थळी भेट दिली. घाटातील खचलेला संरक्षक भिंत पाहून त्यांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून सदर कामाची पाहणी केली आणि त्यावर तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले.
शेखर निकम म्हणाले, “परशुराम घाट हा प्रवाशांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. या ठिकाणी संरक्षक भिंतीचा काही भाग खचल्यामुळे वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. “
“प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीची सोय सुरळीत ठेवण्यासाठी घाटात सुरू असलेल्या कामात आ. निकम स्वतः लक्ष देणार आहेत. स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून तातडीने उपाययोजना करण्यात येतील असे देखील त्यांनी नमूद केले. “

 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                