मानसिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी पुण्यात ‘वॉकेथॉन’

मानसिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी पुण्यात ‘वॉकेथॉन’

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘कनेक्टिंग ट्रस्ट’तर्फे आयोजन; दोनशे स्वयंसेवकांचा सहभाग

पुणे: कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास प्रोत्साहन देण्यासह मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी रविवारी वॉकेथॉनचे आयोजन केले होते. जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी पार्कपासून निघून जंगली महाराज रोड, गुडलक चौक, फर्गसन महाविद्यालय, शिरोळे रस्तामार्गे संभाजी पार्क अशी ही वॉकेथॉन झाली. जागतिक मानसिक आरोग्य दिनाची यंदाची संकल्पना ‘कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य’ अशी आहे. 

 
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त कनेक्टिंग ट्रस्टतर्फे आयोजित वॉकेथॉनला कनेक्टिंग ट्रस्टच्या संस्थापिका व व्यवस्थापकीय संचालक अर्णवाज दमानिया यांच्या हस्ते ध्वज दाखवून सुरुवात झाली. प्रसंगी सहसंस्थापक सँडी डायस, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता मडकईकर, शिल्पा तांबे आदी उपस्थित होते. जागरूक पुणेकरांसह दोनशेपेक्षा अधिक स्वयंसेवक यामध्ये सहभागी झाले. जनजागृतीपर विविध फलक हातात घेऊन, मानसिक आरोग्य जपण्याच्या घोषणा देत स्वयंसेवकांनी जनजागृती केली.
 
प्रसंगी अर्णवाज दमानिया म्हणाल्या, “कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून कनेक्टिंग ट्रस्टने या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वॉकेथॉनचे आयोजन केले आहे. प्रत्येकाने आपल्या मानसिक आरोग्याविषयी सजग राहायला हवे. आत्महत्या प्रतिबंध आणि आत्महत्येला कलंकमुक्त करण्यासाठी कनेक्टींग ट्रस्ट गेली २० वर्षे समर्पित भावनेने कार्यरत आहे.”
प्रणिता मडकईकर म्हणाल्या, “मानसिक आरोग्याविषयी अभ्यासातून कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी अधोरेखित झाली आहे. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांवर होत असलेला परिणाम अभ्यासकांनी मांडला आहे. ‘आयपीएसओएस’च्या अभ्यासात दोनपैकी एका कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्य बिघडण्याचा धोका आढळला आहे. ३५-४५ वयोगटातील लोक, महिला आणि उच्च पदावरील कर्मचारी यांचा समावेश सर्वाधिक धोका असलेल्यांमध्ये होतो. आठवड्याला ४५ तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही या गटात समावेश आहे. या अभ्यासात ९० टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी व व्यक्तिगत जीवन यांचे संतुलन हा मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा सर्वोच्च घटक असल्याचे नमूद केले आहे. ४२ टक्के लोकांनी त्यांच्या नोकरीमुळे तणावग्रस्त असल्याचे मान्य केले. जवळजवळ ४५ टक्के लोकांनी कामाच्या ताणामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम झाला आहे, असे सांगितले. ८० टक्के लोकांनी गेल्या वर्षी तणाव, चिंता, बिघडलेले मानसिक आरोग्य यामुळे कामावरून दोन आठवड्यांची रजा घेतल्याचे कबुल केले. ९० टक्के लोकांच्या मते प्रत्येकवेळी रजेवर असताना त्यांच्याकडून कामाची अपेक्षा केली जात असून, हे चिंताजनक आहे.”

कनेक्टिंग ट्रस्ट विविध कार्यक्रमांद्वारे हजारो लोकांना मदत करत आहे. यात हायस्कूल-काॅलेजेसमध्ये पीअर सपोर्ट तयार करणे, मोफत हेल्पलाइन, ईमेल सपोर्ट, सुसाईड सर्व्हायव्हर सपोर्ट आणि  कनेक्टिंग संस्थेमध्ये प्रत्यक्ष भेटूनही संवाद साधता येतो ह्या विनामूल्य सेवांचा समावेश आहे, असे शिल्पा तांबे यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *