पुण्यातील बड्या बिल्डरच्या आशीर्वादाने नवी कंपनी स्थापून वर्क ऑर्डरही वळवल्या; नव्या कंपनीत बिल्डरही भागीदार
पुणे: कंपनीतील पार्टनरनेच सॉफ्टवेअर, सोर्स कोड, यंत्रसामुग्री आणि स्टाफची चोरी करत वेगळी कंपनी स्थापन केली. ज्या बिल्डरला हे सॉफ्टवेअर पुरवत होतो, त्यानेच चोरी करणाऱ्या सुदर्शन मित्रा व त्याची पत्नी प्रियांका बर्मन याना पाठीशी घालून त्या कंपनीत भागीदारी केली. गेरा बिल्डर्सच्या मदतीने सुदर्शन मित्राने माझी करोडो रुपयांची फसवणूक केली असून, मला आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणात गेरा यांचे नाव आल्याने मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, असा आरोप होम ऍटोमेशन सॉफ्टवेअरचे मूळ मालक गोपाल अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी अग्रवाल यांचे वकील ऍड. राजस पिंगळे, मूकनायिका फाउंडेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळाराम गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष संदिप गायकवाड आदी हे उपस्थित होते.
गोपाल अग्रवाल म्हणाले, “बांधकाम क्षेत्रात लागणाऱ्या होम ऑटोमेशन सॉफ्टवेअरचे उत्पादन करणारी कंपनी २०१५ मध्ये आम्ही सुरु केली. त्यामध्ये मित्रा हे संचालक व भागीदार होते. १० ते ११ सॉफ्टवेअर अभियंते यावर काम करत होते. गेरा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे रोहित गेरा यांच्याशी माझी भेट झाल्यानंतर त्यांच्या प्रकल्पात ४५० फ्लॅट्समध्ये हे सॉफ्टवेअर बसविण्याची ऑर्डर मला मिळाली. परीक्षणासाठी गेरा यांनी त्यांच्या घरी सप्टेंबर २०१७ मध्ये हे सॉफ्टवेअर बसवले. तेव्हा मित्रा यांचा थेट गेरा यांच्याशी संपर्क आला. महिनाभरातच मित्रा माझी कंपनी सोडून गेरा यांच्यासोबत सामील झाला. कंपनी सोडताना मित्रा याने कोणतीही कल्पना दिली नाही. त्याच महिन्यात मित्रा आणि गेरा यांनी ‘होमवन टेक्नॉलॉजी एलएलपी’ नावाने नवीन कंपनी सुरू केली. यामध्ये रोहित गेरा, प्रीतमदास गेरा, प्रियांका बर्मा आणि सुदर्शन मित्रा यांची भागीदारी होती.”
“ही कंपनी सुरु करताना मित्रा याने माझ्या कंपनीतील सर्व सोर्स कोड, मास्टर डेटा, स्टाफ आणि कच्चा माल लुटून नेला. स्टाफ आणि यंत्रणेअभावी काही काळ कंपनीचे काम बंद पडले. त्यानंतर मित्रा याने आपली चूक झाल्याचे कबूल केले व पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी मलाच त्यांच्या कंपनीचा डीलर होण्यासाठी सुचवले. पण नंतर पैसे देण्यास नकार दिला. आधी चोरी आणि नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फातिमानगर पोलीस चौकी गाठली. मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. कालांतराने सुदर्शन मित्रा, प्रियंका बर्मन आणि रोहित गेरा यांच्याविरुद्ध १५६ (३) अंतर्गत गुन्हा दाखल झाला. मित्रा याला अटक झाली. पण कोर्टात खोटी कागदपत्रे सादर करून त्याने दोन दिवसात जामीन मिळवला,” असे गोपाल अग्रवाल यांनी सांगितले.
ऍड. राजस पिंगळे म्हणाले, “पोलिसांनी अर्धवट तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यामुळे अग्रवाल यांनी न्यायालयात धाव घेतली आणि जवळपास सहा महिने कोर्टात दाद मागितल्यानंतर या प्रकरणाचा तपास पुन्हा करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यासह आरोपींविरुद्ध चौकशी होईपर्यंत सर्व उत्पादन आणि बँक खाते गोठवण्याची मागणी केली आहे. पीडित गोपाल अग्रवाल यांच्यावर झालेला अन्याय व अत्याचाराविरुद्ध निष्पक्ष भूमिका मांडून त्यांच्याबरोबर न्याय करून सहकार्य करण्यात यावे. तसेच त्यांना त्वरित पोलीस संरक्षण देण्यात यावे, या विनंतीचे पत्र मुख्यमंत्र्यांसह सर्व विभागांना दिले आहे. समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकारांचा गुन्हा नोंद असून, पोलीस निःपक्षपातीपणे तपास करतील, अशी आमची इच्छा आहे.”
“समर्थ पोलीस ठाण्यात २०२० मध्ये होम ऑटोमेशन सॉफ्टवेअर व अन्य साहित्याची चोरी करून करोडो रुपयांचा घोटाळा करणारा आरोपी सुदर्शन मित्रा बाहेर असून, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करोडो रुपये उकळत आहे. यामध्ये शहरातील प्रतिष्ठित बिल्डर गेरा डेव्हलपर्स सामील असून, गुन्ह्यामध्ये त्यांचे नाव आहे. मात्र, पोलिसांकडून गेरा यांचा बचाव करण्यासह प्रकरण दाबण्याचा प्रकार सुरु आहे. गोपाल अग्रवाल यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. माननीय न्यायालयाने निष्पक्ष चौकशी करून ६० दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश समर्थ पोलीस स्टेशनला दिले आहेत. आरोपींकडून पीडित व त्यांच्या परिवाराला जीवे मारण्याची, तसेच गायब करून टाकण्याची धमकी दिली जात असतानाही पोलिसांनी पीडिताची कुठलीही तक्रार घेतली नाही. आता पुन्हा माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशाने तपास सुरू झाला आहे. याचा राग मनात धरून आरोपी पीडित व त्याच्या परिवाराचे काहीही नुकसान करू शकतात. त्यामुळे अग्रवाल व कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावे,” अशी मागणी बाळाराम गायकवाड यांनी केली.