चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त मेळावा

चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त मेळावा

समाजात नवचैतन्य पेरणाऱ्या संस्थांनी एकत्रित यावे
चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त मेळावा
 
पुणे : “हास्यक्लब ही आता चळवळ झाली असून, यांसारख्या चांगल्या उपक्रमाची संख्या वाढली पाहिजे. लोकांना आनंद वाटून समाजात नवचैतन्य पेरण्याचे काम करणाऱ्या अनेक अराजकीय संस्था पुण्यात काम करत आहेत. अशा सर्व संस्थांना एकत्रित आणून समन्वयाने काम केले, तर पुणे शहर आनंदी व हसरे होईल. त्यासाठी नवचैतन्य हास्ययोग परिवाराने पुढाकार घ्यावा,” असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे, अशी भावना समाजात रुजावी, सकारात्मकता वाढावी, तसेच हास्ययोग लोकप्रिय व्हावा, यासाठी लिम्का बुक किंवा गिनीज बुक यांसारख्या विश्वविक्रमात त्याची नोंद व्हावी. या विश्वविक्रमी कार्यक्रमाच्या संयोजनात माझा पुढाकार राहील व त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत मी करेल. एकाच वेळी २५ हजार लोक हास्ययोग करत आहेत, असा विक्रमी उपक्रम येत्या काही महिन्यात घेतला जावा,’ असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त गणेश कला क्रीडामंच येथे आयोजित मेळाव्याचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. प्रसंगी केंद्रीय हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, पीतांबरीचे मुख्य विक्री अधिकारी मंदार फडके,रॉयल पुरंदर चे राजेश कोठारी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश धोका, ‘नवचैतन्य’चे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे, सुमन काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष विजय भोसले, सचिव पोपटलाल शिंगवी, खजिनदार ऍड. रामचंद्र राऊत, जयंत दशपुत्रे आदी उपस्थित होते. कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान झाले.

‘जगणे सुदृढ होण्यासाठी हास्ययोग हे टॉनिक आहे. नवचैतन्य हास्ययोग परिवाराने ज्येष्ठांच्या आयुष्यात परिवर्तन घडवले आहे. यातूनच सुदृढ समाज निश्चित तयार होईल,’ असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. ‘नवचैतन्य’ समाजाला सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करत असून, महाराष्ट्रात सुरू असलेले हे कार्य दिल्लीपर्यंत नेण्यासाठी सहकार्य करेन, असे प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.

विठ्ठल काटे यांनी हास्ययोग चळवळीचा होत असलेला विस्तार, त्यातून लोकांना होणारा लाभ आणि हास्ययोगाचे महत्व विशद केले. दुसऱ्याला आनंदी करण्याचे काम आम्ही करत आहोत, असेही ते म्हणाले. तसेच मकरंद टिल्लू व सुमन काटे यांच्यासोबत विविध हास्यप्रकार घेत सभागृहात नवचैतन्य फुलवले.

नवचैतन्य हास्ययोग परिवारात आज २३० शाखा, २५ हजार सदस्य आहेत. येत्या काळात एक लाख सदस्य करण्याचे आमचे ध्येय असून, त्यासाठी २५० सोसायट्यांमधून हास्यक्लब सुरु करण्याचा प्रयत्न आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून देशविदेशात आता हास्ययोगाच्या शाखा भरू लागल्यात याचे समाधान आहे. प्राध्यापक, सरकारी कर्मचारी, कंपन्या यांच्यासाठी हास्ययोग कार्यशाळा घेत आहोत”, असे मकरंद टिल्लू यांनी नमूद केले.

यावेळी विविध शाखेतील सुमारे ४०० सदस्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन सुभाष राजवळ यांनी केले. आभार विजय भोसले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *