नवतंत्रज्ञानावर स्वार होत यशशिखरे पादाक्रांत करा
डॉ. विवेक सावंत यांचा सल्ला; ‘आयसीएमएआय’च्या वतीने सीएमए परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार
पुणे: “तंत्रज्ञानाचा क्रांतीमुळे संपूर्ण डिजिटल व स्मार्ट होत आहे. सर्वकाही मोबाईलवर आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, मशीन लर्निंग यांसारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या आविष्काराने उत्पादने, सेवा आणि ज्ञानाच्या व्याख्याच बदलून गेल्या आहेत. त्यामुळे याचा वापर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, या नवतंत्रज्ञानासोबत वाहवत न जाता, त्यावर स्वार होऊन, त्याचा योग्य उपयोग करून यशशिखरे पादाक्रांत करा,” असा सल्ला महाराष्ट्र ज्ञान महामंडळांचे चीफ मेंटॉर डॉ. विवेक सावंत यांनी दिला.
दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएमएआय) वतीने नुकत्याच झालेल्या कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स (सीएमए) इंटरमिजिएट व फायनल परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. विवेक सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. कर्वेनगर येथील सीएमए भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात ‘आयसीएमएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीएमए नीरज जोशी, माजी सदस्य सीएमए डॉ. संजय भार्गवे, विभागीय समिती सदस्य सीएमए चैतन्य मोहरीर, आयसीएमएआय’ पुणेचे अध्यक्ष सीएमए नीलेश केकाण, उपाध्यक्ष सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली, सचिव सीएमए राहुल चिंचोळकर, कार्यकारिणी सदस्य सीएमए अमेय टिकले, सीएमए तनुजा मंत्रवादी आदी उपस्थित होते.
डॉ. विवेक सावंत म्हणाले, “जगभरात ऍटोमेशनवर भर दिला जात आहे. आभासी दुनियेत प्रत्यक्ष अनुभव यावा, असे अविष्कार होत आहेत. आयुष्याशी संबंधित सर्वच घटकांचे डिजिटलायझेशन होत आहे. सीमा भेदल्या जात आहेत. विविध संस्कृतींचे एकत्रीकरण होत आहे. जगभरातील कोणत्याही व्यक्तीशी आपण जोडले जाऊ शकत आहोत. आर्थिक व्यवहार, आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्था, न्यायप्रणाली, अन्नपुरवठा सगळे काही मोबाईलच्या ऍपवर आले आहे. तंत्रज्ञानाची ही बाजारपेठ खुली असल्याने यात अनेक संधी आहेत. त्याचा वेध घेत आपण आपल्याला विकसित करावे. हे बदल आत्मसात करून त्यानुसार आपल्या कामामध्ये अद्ययावतीकरण आणावे. तुम्ही स्वतःला जितके जास्त व्यापक कराल, तितक्या अधिक संधी तुम्हाला मिळणार आहेत.”
सीएमए डॉ. संजय भार्गवे म्हणाले, “शारीरिक व मानसिक संतुलन साधून आपले करिअर घडवावे. करिअर आणि व्यक्तिगत जीवनाचा समतोल साधत स्वतःसाठी वेळ द्या. लेखन व वाचन आपले आयुष्य समृद्ध करतात. त्यामुळे वाचनाची व लेखनाची आवड व अन्य छंद जोपासा. नियमित व एकाग्रतेने अभ्यास केला, तर स्पर्धात्मक युगात कोणत्याही परीक्षेला सामोरे जाता येते.”
सीएमए नीरज जोशी म्हणाले, “नव्या गोष्टी शिका. करिअरमध्ये अनेक संधी येतील. त्याला अनुसरून कौशल्ये आत्मसात करा. आपल्या प्रोफेशनची तत्वे सांभाळत नैतिकतेने व सामाजिक भावनेने काम करायला हवे. सीएमए समाजाच्या हितासाठी, आर्थिक विकासासाठी व नियोजनासाठी कार्यरत असतो. सीएमए म्हणून काम करताना आपले चारित्र्य संभाळणेही महत्वाचे आहे.”
सीएमए सुजाता बुधकर, माजी अध्यक्ष सीएमए नागेश भागाने यांचाही सन्मान करण्यात आला. सीएमए नीलेश केकाण यांनी स्वागत प्रास्ताविक केले. सीएमए अमेय टिकले यांनी समन्वयन केले.श्रेया देवकर व प्रियांका जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली यांनी आभार मानले. सांस्कृतिक सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
.