राजाभाऊ चोपदार यांचे प्रतिपादन; राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीतर्फे वारकरी संमेलनाचे उद्घाटन

राजाभाऊ चोपदार यांचे प्रतिपादन; राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीतर्फे वारकरी संमेलनाचे उद्घाटन

नीती, सत्य, प्रेम व सद्भावाच्या संरक्षणासाठी धर्मयुद्ध व्हायला हवीत

राजाभाऊ चोपदार यांचे प्रतिपादन; राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीतर्फे पहिल्या वारकरी संमेलनाचे उद्घाटन

पुणे, ता. २५: अधर्माने, अनीतीने व असत्याने वागणाऱ्यांवर प्रहार करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला धर्मयुद्ध करण्यास सांगितले. धर्मयुद्ध म्हणजे जाती-धर्माची लढाई नाही, तर चांगल्याचा वाईटावर, सत्याचा असत्यावर, नीतीचा अनीतीवर, धर्माचा अधर्मावर प्रहार आहे. वारकरी संप्रदायाने नीटपणे धर्मयुद्धाचा अर्थ समजून समाजात जागृती करावी. अन्याय, अत्याचारावर कृतीतून प्रहार करावेत. सर्व जाती-धर्माना सामावून घेणारा, एकसंध ठेवणारा संत विचार व्यापकपणे जनमानसात रुजवायला हवा,” असे प्रतिपादन ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार हभप राजाभाऊ महाराज यांनी केले.

राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या वतीने शुभारंभ लॉन्स येथे आयोजित पहिल्या वारकरी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी राजाभाऊ चोपदार बोलत होते. या संमेलनात राज्यभरातून वारकरी सहभागी झाले होते. यावेळी संमेलनाध्यक्ष व संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे माजी अध्यक्ष हभप बापूसाहेब महाराज देहूकर, हभप भारत महाराज जाधव, हभप राजेंद्र येप्रे महाराज, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गायकवाड, राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल (आबा) महाराज मोरे, राज्य उपाध्यक्ष हभप मुबारक महाराज शेख, हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर आदी उपस्थित होते.

हभप राजाभाऊ चोपदार म्हणाले, “अलीकडच्या काळात धर्मयुद्ध म्हणजे दोन धर्मियांमधील युद्ध मानून द्वेष पसरवला जात आहे. रामायण, महाभारतातील युद्ध हेही धर्मयुद्ध होते. मात्र, ते हिंदू-मुस्लिम किंवा अन्य कोणत्याही धर्मांत नव्हते. असत्याविरुद्ध सत्याचे, अनीतीविरुद्ध नीतीचे, द्वेषाविरुद्ध प्रेमाचे असे हे युद्ध होते. आजच्या काळात याच धर्मयुद्धाची गरज आहे. संविधानाने सर्वांना समान अधिकार व कर्तव्ये दिलीत. मात्र, त्याचे पालन नीट होत नाही. संविधानातील कलमे संतांच्या व सोप्या भाषेत लोकांना सांगायला हवीत.”

हभप भारत महाराज जाधव म्हणाले, “वारकरी संप्रदाय नसता, तर महाराष्ट्र घडला नसता. नामदेव महाराजानी याची बीजे रोवली. वारकरी संप्रदायाने समाज जोडण्याचे, विचार देण्याचे व सन्मान दाखवण्याचे काम केले आहे. सध्याचे राज्यातील वातावरण फोडाफोडीचे असून, त्यापासून आपण अलिप्त राहायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेदेखील संत होते. ज्यांनी प्रत्येकाच्या भल्याचा, कल्याणाचा विचार केला. समाजाला एकसंध ठेवण्याचे काम वारकऱ्यांनी करावे.”

हभप राजेंद्र यप्रे महाराज म्हणाले, “स्वराज्यनिर्मितीत छत्रपती शिवरायांना साथ देणाऱ्या वारकरी संप्रदायाचे मुघलांच्या आक्रमणावेळी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी संरक्षण केले. त्यांचा राजाश्रय मिळाल्याने वारकरी परंपरा टिकली. या आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा राजाश्रय घेऊन काम होत आहे. मात्र, राजकीय आघाड्यांत जाताना वारकरी संप्रदायाने मूळ उद्देश सोडू नये. समाजातील वाईट घटनांच्या विरोधात वारकर्‍यांनी आवाज उठवावा.”

डॉ. श्रीरंग गायकवाड म्हणाले, “वारकरी संप्रदाय सर्व जाती-धर्माच्या लोकांना सामावून घेणारा आहे. समाजातल्या सर्व उपेक्षितांना सोबत घेऊन जाण्याचा संदेश सर्व संतानी दिला आहे. संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत. तरुण पिढीमध्ये हा संत संस्कार, विचार रुजवायला हवा. ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांवर आधारित शिक्षण देण्याची गरज आहे. त्यातून आजचा समाज संस्कारित होऊ शकेल. राजकीय पक्षांनाही आता वारकर्‍यांच्या समस्यांकडे लक्ष देणे महत्त्वाचे वाटत आहे.”

प्रास्ताविकात आबा महाराज मोरे म्हणाले, “वारकरी संप्रदाय वैश्विक विचारांचा, जातीभेदाच्या पलीकडे जाऊन एकात्मतेचा संदेश देतो. शिव-फुले-शाहू-आंबेडकरांनी हाच वारसा पुढे नेत आपल्याला प्रेरणा दिली. वारकरी संप्रदायाचा हाच विचार घेऊन समाजात विवेकाची, सर्व जाती-धर्माच्या एकात्मतेची पेरणी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीची स्थापना झाली आहे. शरद पवार यांच्या आशीर्वादाने, जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत.”

हभप श्यामसुंदर महाराज यांनी सूत्रसंचालन केले. हभप मुबारक महाराज शेख यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *