शिवसंग्राम पक्ष विधानसभेच्या पाच जागा लढवणार : डॉ. ज्योती मेटे
अध्यक्षपदी डॉ. ज्योती विनायक मेटे यांची फेरनिवड; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शिवसंग्राम’मध्ये खांदेपालट
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्ष पाच जागा लढवणार असल्याची माहिती अध्यक्षा डॉ. ज्योती विनायक मेटे यांनी दिली. पुण्यात रविवारी (ता. १८) झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर डॉ. मेटे पत्रकारांशी बोलत होत्या. डॉ. मेटे यांची सर्वानुमते शिवसंग्रामच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.
दिवंगत विनायक मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेची सर्वसाधारण सभा डॉ. ज्योती विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात रविवारी (ता. १८) पार पडली. नव्या कार्यकारिणीची निवड, आगामी विधानसभा निवडणूक आदी गोष्टींवर चर्चा झाली. विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्याने पुढील पाच वर्षांसाठी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. प्रदेश उपाध्यक्षपदी शिवसंग्रामचे ज्येष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे आणि छत्रपती संभाजीनगरचे सलीम पटेल यांची निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी नांदेडचे नितीन लाठकर, खजिनदारपदी मुंबईचे राम जगदाळे, चिटणीसपदी भंडाऱ्याचे प्रा. डी. एस. कडव, मुंबईचे योगेश विचारे आणि सदस्यपदी हिंदुराव जाधव, भरत लगड, बालाजी जाधव, सुंदर मस्के यांची निवड करण्यात आली.

स्वर्गीय विनायक मेटे यांच्या संकल्पनेतील व सातत्याने पाठपुरावा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे २४ डिसेंबर २०१६ रोजी जलपूजन होऊनही काम पूर्णत्वास गेले नसल्याने याचा शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा आणि मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यात यावे, असे ठराव या सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डॉ. ज्योती मेटे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्व पदाधिकाऱ्यांनी आगामी काळात संघटनेची पुनर्बांधणी करावी. येणाऱ्या विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांसाठी मेहनतीने संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष बांधणी करावी. शिवसंग्राम सर्व निवडणुका ताकदीनिशी लढणार असून विधानसभेच्या पाच जागा देखील लढणार आहे. या पाचही जागा निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
                            
 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                