महाराष्ट्राला ठेंगा दाखविणाऱ्यांना जनता माफ करणार नाही
रोहन सुरवसे-पाटील यांची टीका; केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची जनतेची भावना
पुणे : केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आश्वासनांची खैरात केली. मात्र, बिहार-आंध्रसाठी पाऊस, तर महाराष्ट्र कोरडाच ठेवला आहे. काँग्रेसच्या अर्थसंकल्पाची कॉपी करून जनतेची दिशाभूल केली आहे. महाराष्ट्रा ठेंगा दाखविणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले.
रोहन सुरवसे-पाटील म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभेसाठी सावध पवित्रा घेतला आहे. जुन्याच योजनांना पॉलिश करून नव्याने जाहीर केल्याचे दाखविले असल्याने सामान्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गृहिणींसाठीच्या गॅसच्या किमतीबाबत कुठेही उल्लेख नाही. गॅस दररोज लागणारी गोष्ट आहे, तर मोबाईल, चार्जर स्वस्त केला, ही बाब दररोज लागणारी नाही. लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देणार आणि दुसरीकडे महागाई वाढवून ती दुपटीने वसूल करण्याची नामी संधी सरकारने साधली आहे. रोजगार निर्मितीबाबत कुठलीही ठोस उपाययोजना नाही, त्यामुळे बेकारी वाढून गुन्हेगारी वाढण्याची भीती वाटत आहे.”
केंद्र सरकारने सामान्यांना विकास पाहण्यासाठी दुर्बिन दिली, तर बरे होईल. मागील दहा वर्षांमध्ये केंद्र सरकारने सामान्यांसाठी कोणत्या उपाययोजना राबविल्या ते एकदा जाहीर केले पाहिजे. तसेच राज्यामध्ये ईडी-सीडीचा वापर करून फोडाफोडीचे राजकारण करून सरकार अस्थिर करण्याचे काम केले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नाकर्तेपणाला कंटाळून चारशे पारचा नारा जनतेने फोल ठरविला आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात दोनशेचा नारा दिला आहे. केंद्राने अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला ठेंगा दाखवला आहे, त्याचा राग जनतेच्या मनामध्ये असून, येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र त्यांना खड्यासारखे बाजूला केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास रोहन सुरवसे-पाटील यांनी व्यक्त केला.