‘सूर्यदत्त’च्या सांस्कृतिक कार्याची दखल आनंददायी : सुषमा चोरडिया
अभिनेते दीपक शिर्के, मीनाक्षी शेषाद्री यांच्या हस्ते ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अकॅडमी अवॉर्ड २०२४’ने सन्मान
पुणे: सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांना ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अकॅडमी अवॉर्ड २०२४’ नुकताच प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के व प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांच्या हस्ते चोरडिया यांना सन्मानित करण्यात आले. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड अकॅडमीतर्फे नुकतेच पुरस्कार सोहळ्याचे व ‘मिस अँड मिसेस इंडिया २०२४’ या ग्रँड फॅशन शोचे पुण्यात आयोजन केले होते.
प्रसंगी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, सूर्यदत्त ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, अभिनेत्री मोनालिसा बागल, अश्विनी बागल, अभिनेते प्रसाद शिखरे, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे महेश थोरवे, शालिनी फाउंडेशनचे संस्थापक विशाल गोरे, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. अविनाश सकुंडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, बाल चित्रपट, ॲनिमेशन, वेब सिरीज यासाठी ‘गोल्डन लोटस अवॉर्ड’, सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, बालकलाकार, सहाय्यक अभिनेता, छायांकन, पटकथा, रंगभूषा, गीतलेखन, वेशभूषा, संगीत दिग्दर्शक, गायक, गायिका, कोरिओग्राफी, संकलन, स्पेशल इफेक्ट यासाठी ‘सिल्वर लोटस अवॉर्ड’ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सुषमा चोरडिया म्हणाल्या, “सूर्यदत्ततर्फे सातत्याने शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनॉलॉजीच्या वतीने आयोजित होणाऱ्या ‘ल क्लासे’ वार्षिक फॅशन शोने देशात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन अँड इव्हेंट मॅनजमेंटच्या वतीने प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातील कलाकारांचा विद्यार्थ्यांशी संवाद साधला जातो. त्यामुळे मराठी व हिंदी चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक ‘सूर्यदत्त’ला आवर्जून भेट देतात. ‘सूर्यदत्त’च्या या सांस्कृतिक योगदानाची आज दखल घेतल्याचा आनंद वाटतो.”
आजवर सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, संजय जाधव, स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, संदीप पाठक अशा दिग्गज मराठी कलाकारांनी, तसेच रझा मुराद, रणजित, अक्षय कुमार, वरुण धवन, कियारा अडवाणी, आलिया भट, विवेक ओबेरॉय, आयुष्मान खुराणा, शर्मन जोशी, रितेश देशमुख, तुषार कपूर, उर्वशी रौतेला, यामी गौतम, शेखर सुमन या नावाजलेल्या हिंदी कलाकारांनी ‘सूर्यदत्त’ला भेट दिली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित, हेमा मालिनी यांसह अन्य कलाकारांना सूर्यदत्तच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून सूर्यदत्त सुर्यभारत महोत्सव, दिवाळी पहाट, संगीत संध्या, सुरेल संध्या अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सूर्यदत्ततर्फे केले जाते. अनुप जलोटा, शंतनू गोखले, अजिंक्य जोशी व एस. आकाश अशा कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. तसेच भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान, पद्मविभूषण पंडित जसराज, पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया, पद्मभूषण उदित नारायण, पद्मभूषण राशीद खान, पद्मश्री शंकर महादेवन आदी प्रख्यात कलाकारांना सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले आहे, असे त्यांनी नमूद केले.