पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त सनदी लेखापालांकडून विकसित भारत दौडचे आयोजन करण्यात आले. ‘आयसीएआय’ पुणे शाखा आणि विद्यार्थ्यांच्या ‘विकासा’ शाखेच्या वतीने आयोजित दौडला सारसबाग येथून सुरवात झाली. २०० पेक्षा अधिक सीए सभासद, विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय यामध्ये सहभागी झाले होते.
सीए जुगल राठी यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सारसबाग येथून सुरु झालेली ही दौड मित्रमंडळ चौक, लक्ष्मीनारायण चौक, सिटीप्राईड, निमंत्रण हॉटेल, बिबवेवाडी सिग्नल, महावीर इलेक्ट्रॉनिक्स या मार्गाने आयसीएआय भवन येथे पोहोचली. ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, उपाध्यक्ष सीए सचिन मिणियार, ‘विकासा’ चेअरमन सीए प्रणव आपटे, सीए प्रितेश मुनोत, सीए अजिंक्य रणदिवे आदी उपस्थित होते.
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव २०४७ मध्ये होत असताना भारत विकसित देश व्हावा, हे ध्येय ठेवले आहे. आर्थिक प्रगती, सामाजिक सुधारणा, शाश्वत पर्यावरण, चांगले प्रशासन, सर्वांगीण विकास यातून हे ध्येय साकारले जाणार आहे. हेच ध्येय घेऊन आयसीएआय ही संस्था स्थापनेपासूनच कार्यरत आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचे वहन नीट व्हावे, यासाठी सनदी लेखापाल काम करत आहेत. विकसित भारत याबाबत जागृती करणारा हा उपक्रम होता.”
सीए अमृता कुलकर्णी म्हणाल्या, “पंतप्रधानांच्या या ध्येयात आमचे समर्पण आणि सहभाग दाखवण्याचा उद्देश यामध्ये होता. सीए इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून संपूर्ण देशभर या दौडचे आयोजन करण्यात आले. आयसीएआयच्या ७५ वर्षानिमित्त देशातील पाच विभागीय मंडळे, १७५ शाखा, चॅप्टर्स, स्टडी सर्कल आणि परदेशातील चॅप्टर्सनेही यात भाग घेतला आहे.”