डॉ. सुरेश माळी लिखित ‘आयएसओ ग्लोबल बेनिफिट्स’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे: “व्यावसायिक विश्वासार्हता, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसायाची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढण्यासाठी ‘आयएसओ’ प्रमाणीकरण महत्वाचे ठरते. त्रिभाषिक असलेल्या या पुस्तकाचे २४ पैलू आहेत. ‘आयएसओ’मुळे गुणवत्तेचा दर्जा कायम राखत ग्राहकांचे समाधान वाढण्यासह उत्पादनाची किंमत कमी होण्यास मदत होईल,” असे मत यूलिंक ऍग्रीटेक मुख्य कार्यपालन अधिकारी व ‘आयएनआय’चे संचालक अश्विनीकुमार रघुवंशी यांनी व्यक्त केले.
‘आयएसओ’ प्रमाणीकरण तज्ज्ञ डॉ. सुरेश दामोदर माळी उर्फ सुदामा यांनी लिहिलेल्या ‘आयएसओ ग्लोबल बेनिफिट्स’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. फर्ग्युसन रस्त्यावरील विद्यार्थी साहाय्यक समितीच्या मोडक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलाश्री ग्रुप ऑफ कंपनीचे उद्योजक कृष्णात अडसूळ होते. प्रसंगी डॉ. सुरेश माळी यांचे कुटुंबीय, समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी उपस्थित होते.
डॉ. सुरेश माळी म्हणाले, “एका दिवसात २४ तास असतात. कोणार्क सुर्यरथाला २४ चक्र आहेत आणि ‘आयएसओ ग्लोबल बेनिफिट्स’ पुस्तक २४ पैलूंवर आधारित आहे. त्याचे प्रकाशन २०२४ मध्ये होत आहे. २४ चा हा योग मला अभिमानास्पद आहे. तसेच पुस्तकात आयएसओ, व इतर ऑडिट्स व सर्टिफिकेशन्सचे वर्णन आहे. आपल्या व्यवसायाच्या गुणवत्ता व विश्वासार्हता वाढीसाठी आयएसओ प्रमाणीकरण करून घ्यायला प्रोत्साहन दिले पाहिजे.”
कृष्णात अडसूळ यांनी आयएसओ करताना ऑडिट्सचे महत्व सांगितले. यावेळी आयएसओ प्रामाणिकरणाच्या संचालिका शोभा माळी यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कार्याचा लघुपट यावेळी दाखवण्यात आला. उमेश कणकवलीकर (मी विजेता होणारच) यांच्या कंपनीला आयएसओ मानांकन प्रदान करण्यात आले. पुस्तक घरपोच मिळण्यासाठी ८०८७०५९००१ / ७६२००२०४५९ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन माळी यांनी केले.