डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादन; ‘२०४७ च्या भारतासाठी धोरणात्मक, वैज्ञानिक कृती’वर व्याख्यान

डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादन; ‘२०४७ च्या भारतासाठी धोरणात्मक, वैज्ञानिक कृती’वर व्याख्यान

विकसित भारताआधी भ्रष्टाचारमुक्त भारताची आवश्यकता
डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादन; ‘२०४७ च्या भारतासाठी धोरणात्मक, वैज्ञानिक कृती’वर व्याख्यान
 
 
पुणे : “भ्रष्टाचारमुक्त भारत हाच खऱ्या अर्थाने २०४७ मधील विकसित भारत असेल. तेव्हा ‘भारत’ आणि ‘इंडिया’, असा फरक नसेल. भारताने आधी भ्रष्टाचारमुक्त व्हावे, तरच विकसित भारत अर्थपूर्ण ठरेल”, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. सुशासन, लोकशाही मूल्यांची जपणूक, सुरक्षेची ग्वाही असेल, तेव्हाच भारत ‘लॅंड ऑफ आयडियाज’ पुरता मर्यादित न राहता ‘लॅंड ऑफ  अपॉर्च्युनिटीज’ बनेल, असेही डॉ. माशेलकर यांनी नमूद केले.
विज्ञान भारतीचे माजी राष्ट्रीय संघटन सचिव स्वर्गीय जयंत सहस्रबुद्धे यांच्या जन्मदिनानिमित्त ‘जयंतस्मृति’ व्याख्यान व पुस्तक प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, विवेक प्रकाशन आणि विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने मयूर कॉलनीतील एमईएस सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे ‘२०४७ च्या भारतासाठी धोरणात्मक आणि वैज्ञानिक कृती’ यावर विशेष व्याख्यान झाले. तसेच यावेळी पश्चिम महाराष्ट्र विज्ञान भारतीचे माजी अध्यक्ष आणि इस्रोचे माजी समूह संचालक डॉ. सुरेश नाईक लिखित विवेक प्रकाशन प्रकाशित ‘इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा’ या वैज्ञानिक पुस्तकाचे प्रकाशनही झाले.
 
ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला होती. तसेच एमईएस नियामक मंडळ उपाध्यक्ष आनंदी पाटील, विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. योगेश शौचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, विवेक प्रकाशनाचे सहकार्यकारी संपादक दीपक जेवणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. यावेळी इंटर्नशिप पोस्टरचे विमोचनही झाले. पोस्टरविषयी डॉ. नंदिनी कोठारकर यांनी माहिती दिली. तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यातील विजेत्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा झाला.

डॉ. माशेलकर यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेकानेक उदाहरणे देत विकसित भारताची प्रतिमा श्रोत्यांसमोर उभी केली. ते म्हणाले, ‘तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून आपण उत्पन्नाच्या पातळीवरील असमानता दूर करू शकतो. आपल्या युवा पिढीने समाजातील तळागाळाच्या हिताचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपण धर्म, जात, भाषा, वंशाच्या नावावर विभाजित होत असल्याचे चित्र आहे. पण आपण प्रत्येकाने जातीमुक्त भारताचे स्वप्न पाहिले पाहिजे. स्वातंत्र्याच्या शताब्दीवर्षांतला भारत हा सुसंस्कृत, सुशिक्षित, सुरक्षित, समृद्ध आणि स्वानंदी असावा, असे मला वाटते’.

डॉ. भटकर यांनी जयंतराव सहस्रबुद्धे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘जयंतराव सर्वसामान्यांच्या सेवेसाठी समर्पित होते. त्यांची विज्ञानाकडे पाहण्याची दृष्टी निराळी होती. त्यांचे समाजासाठीचे योगदान अविस्मरणीय होते, त्यांनी दिलेली दृष्टी आणि दिशा पकडून आपण काम केले पाहिजे’, असे भटकर म्हणाले.

भूषण गोखले यांनी अध्यक्षीय समारोपात जयंतरावांचे स्मरण केले. डॉ. मानसी माळगावकर यांनी ऋणनिर्देश केला. डॉ. सुनील कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कीर्ती बडवे यांनी परिचय करून दिला. डॉ. योगेश शौचे यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. डॉ. कौस्तुभ साखऱे यांनी जयंतराव सहस्रबुद्धे यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *