स्वागताध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल, तर कार्याध्यक्षपदी डॉ. विजय ताम्हाणे यांची निवड; चंद्रकांत दळवी उद्घाटक
पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने होणाऱ्या पहिल्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्षपदी उद्योजक कृष्णकुमार गोयल, तर कार्याध्यक्षपदी प्रसिद्ध दंतरोपणतज्ज्ञ डॉ. विजय ताम्हाणे यांची निवड झाली आहे. बंधुता लोकचळवळीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त १२ एप्रिल २०२४ रोजी हे संमेलन होणार आहे, अशी माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.
नवी पेठेतील एसएम जोशी सभागृहात आयोजित या संमेलनाचे उद्घाटन माजी विभागीय आयुक्त व रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संविधानप्रेमी प्रा. सुभाष वारे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या आयोजनासाठी प्रा. शंकर आथरे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, मधुश्री ओव्हाळ, डॉ. अरुण आंधळे, डॉ. अशोक कुमार पगारिया, डॉ. बंडोपंत कांबळे, डॉ. संजय गायकवाड, संगीता झिंजुरके आणि प्रशांत रोकडे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे, असे रोकडे यांनी सांगितले.