‘देशासाठी रोजगारनिर्मिती, हाच घे भरारीचा ध्यास’ अभियानाची गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद

‘देशासाठी रोजगारनिर्मिती, हाच घे भरारीचा ध्यास’ अभियानाची गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद

एकाच आशयाचे ८९९२ व्हिडीओ चित्रित; नवउद्योजकांच्या ‘घे भरारी’ प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे : ‘घे भरारी’ या महिला उद्योजिकांच्या ग्रुपतर्फे ‘देशासाठी रोजगारनिर्मिती, हाच घे भरारीचा ध्यास’ अभियानांतर्गत एकाच आशयाचे सर्वाधिक ८ हजार ९९२ व्हिडीओ बनवल्याचा अनोखा विश्वविक्रम गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला गेला. ‘घे भरारी’च्या नावावर हा आंतरराष्ट्रीय विक्रम नोंदला गेल्याचे प्रमाणपत्र लंडनस्थित गिनीस वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी ऋषी नाथ यांच्या हस्ते, फॅसिलिटेटर मिलिंद वेर्लेकर यांच्या उपस्थितीत ‘घे भरारी’च्या राहुल कुलकर्णी व नीलम उमराणी-एदलाबादकर यांना प्रदान करण्यात आले. संगीता साक्रीकर, डॉ. मृणाल कोठारी व सीए शीतल वैद्य तसेच संजीवनी शिंत्रे यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमांप्रमाणे हे व्हिडीओज असल्याची नोंद करण्यासाठी या सर्व व्हिडिओंची गिनीसच्या गाईडलाईन्स प्रमाणे पडताळणी केली.

 
‘देशासाठी रोजगारनिर्मिती, हाच घे भरारीचा ध्यास’ किंवा ‘क्रिएटिंग जॉब्स फॉर द नेशन, इज घे भरारीज पॅशन’ हे वाक्य म्हणत पाच सेकंदाचा व्हिडीओ बनवायचा होता. या एकाच वाक्याच्या व्हिडिओचा  सर्वात मोठा व्हिडीओ अल्बम बनवल्याचा हा विक्रम आहे. हा विक्रम होण्यासाठी ‘घे भरारी’च्या अनेकांनी खूप मोठे योगदान दिले. या विक्रमामुळे ‘घे भरारी’चे व्यावसायिक आता जागतिक पातळीवर नोंदवले गेले आहेत. आपले छोटे व्यावसायिक हेच उज्ज्वल भारताचे भविष्य आहेत, असे रेकॉर्ड फॅसिलिटेटर मिलिंद वेर्लेकर यांनी नमूद केले.
 
 
नीलम उमराणी-एदलाबादकर म्हणाल्या, “फेसबुकवर सुमारे दोन लाख २० हजार लोकांचा समूह असलेला ‘घे भरारी’ हा एक व्यावसायिक ग्रुप आहे. कोविड काळात छोट्या व्यावसायिकांवर ओढवलेल्या संकटातून त्यांना बाहेर येण्यासाठी व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी फेसबुकवर ‘घे भरारी’ या ग्रुपची स्थापना झाली. फ्री पोस्टिंग असलेला अत्यंत ऍक्टिव्ह ग्रुप म्हणून ‘घे भरारी’ प्रसिद्ध आहे. प्रदर्शने, मेळावे, फेसबुक लाईव्ह व प्रशिक्षण शिबिरे अश्या अनेक माध्यमातून व्यावसायिक सक्षम होतील याचा प्रयत्न केला जातो. ‘घे भरारी’ची गेल्या तीन वर्षांत ४५ प्रदर्शने झाली आहेत. पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर येथे अत्यंत यशस्वी प्रदर्शने करणारी ‘घे भरारी’ ही संस्था सर्वांसाठी वन स्टॉप शॉपिंग सेंटर बनली आहे. जवळपास ६५०० व्यावसायिक या ग्रुपशी जोडले आहेत.”
 
राहुल कुलकर्णी म्हणाले, “जास्तीत जास्त छोट्या व्यावसायिकांपर्यंत पोचण्यासाठी प्रतिकात्मक गोष्टींची गरज असते. अलीकडे अनेक रेकॉर्ड केली जातात. परंतु गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हे एकमेवाद्वितीय असून, त्याची तुलना कशाचीही होऊ शकत नाही. छोट्या व्यावसायिकांचा जागतिक स्तरावर ठसा उमटवणे हे ध्येय या रेकॉर्डमुळे साध्य झाले असून, यामुळे भारतीय छोट्या व्यावसायिकांना जागतिक स्तरावर मान्यता मिळेल अशी आशा आहे. हे रेकॉर्ड ‘घे भरारी’सह प्रत्येक छोट्या व्यावसायिकाचा मानबिंदू ठरेल, यात शंका नाही. ‘नोकरी मागणारे न होता नोकऱ्या देणारे व्हा’ हा घे भरारीचा हेतू यातून सफल होईल.”
——————————————————
तीन दिवसीय ‘घे भरारी’ प्रदर्शनाचे उद्घाटन
जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे आयोजित ‘घे भरारी’ प्रदर्शनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. येत्या रविवारपर्यंत (दि. ११ फेब्रुवारी) सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. या प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलवर वैविध्यपूर्ण आणि युनिक उत्पादने आहेत. इतरत्र पहायला न मिळणाऱ्या अनेक नाविन्यपूर्ण व कलात्मक गोष्टी येथे आहेत.
 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *