परमवीर चक्र विजेते योगेंद्रसिंग यादव यांच्या हस्ते ‘#व्हायरल_माणुसकी’ पुस्तकाचे प्रकाशन

परमवीर चक्र विजेते योगेंद्रसिंग यादव यांच्या हस्ते ‘#व्हायरल_माणुसकी’ पुस्तकाचे प्रकाशन

“मानवता, बंधुभावाचा विचार समाजाला सक्षम बनवेल,
प्रत्येकाने कर्तव्य भावनेतून मानवी कल्याणाचे काम करावे”
परमवीर चक्र विजेते योगेंद्रसिंग यादव यांचे मत; वैभव वाघ लिखित ‘व्हायरल माणुसकी’ पुस्तकाचे प्रकाशन
 
पुणे : “मानवता, बंधुभावाचा विचार समाजाला सक्षम बनवतो. समाजातील प्रत्येकाने कर्तव्य हाच धर्म मानून मानवी कल्याणाचे काम केले, तर देशात, समाजात शांततेचे वातावरण नांदेल. जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येयनिश्चिती व त्याच्या पूर्तीसाठी कर्तव्यनिष्ठा, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड उपयोगी ठरते,” असे मत  कारगिलच्या लढ्यातील शौर्याबद्दल १९ व्या वर्षी परमवीर चक्र हा सर्वोच्च पुरस्कार मिळवलेल्या ग्रेनेडीयर योगेंद्रसिंग यादव यांनी व्यक्त केले. तरुणाईने तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता त्याचा गरजेपुरता चांगला वापर करायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले. 
 
सामाजिक जाणीवेतून वैभव सुनंदा पंडित वाघ लिखित व न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित ‘व्हायरल माणुसकी’, निगेटिव्ह काळातील पॉजिटीव्ह गोष्ट पुस्तकाचे प्रकाशन योगेंद्रसिंग यादव यांच्या हस्ते झाले. कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक लोकांना सर्व प्रकारची मदत करणाऱ्या योद्ध्यांची कथा वाघ यांनी या पुस्तकातून मांडली आहे. प्रसंगी या लढवय्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या मातांचा, तसेच कोरोना काळात कार्यरत विविध संस्थांचा सन्मान यादव यांच्या हस्ते करण्यात आला.
 
योगेंद्रसिंग यादव म्हणाले, “शिवाजी महाराजांच्या पावन भूमीवर येणे, हे माझे भाग्य समजतो. कोरोना काळात वाघ यांनी केलेले कार्य कौतूकास्पद आहे. आपल्या आयुष्यात आईला अनन्यसाधारण महत्व आहे. आईच आपल्याला जीवन जगत असताना प्रेरित करते. भारत देशाला आपण माता संबोधतो. आईच्या प्रेरणेतून हे कार्य करण्याची ऊर्जा वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली. वाघ यांनी आपल्या सामाजिक जाणिवेतून समाजाप्रती कर्तृत्वाचे जबाबदारीचे, केलेल्या कार्याचे शब्दांमधून बंधुतेचे, मानवतेचे उत्तम दर्शन घडवले आहे.”
 
“मानवता हाच धर्म समजून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. मानवतेचे कल्याण व आपल्या संस्कृतीचे संरक्षण करायचे असेल, तर आपण सर्वानी एकत्र येऊन समाजाप्रती असणारी कर्तव्ये, भारतीय संस्कृती प्रत्येक भारतीयांमध्ये रुजवायला हवीत. जीवनात यशस्वी व्हायचे असेल स्वतःला एक सूत्रामध्ये बांधायला हवे. भारतीय म्हणून संरक्षण करायचे असेल, तर प्रत्येकाला सैन्यात जायची गरज नाही. आपण आपली सामाजिक कर्तव्ये पार पाडूनही राष्ट्रभक्ती करता येते,” असेही योगेंद्रसिंग यादव म्हणाले.
 
योगेंद्रसिंग यादव पुढे म्हणाले, “देशाची प्रगती साधायची असेल, तर शांतता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. सामाजिक शांततेप्रमाणे वैयक्तिक शांतताही महत्वाची आहे. जीवनात यशस्वी व्हायचे, तर स्वप्न बघा, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहा. प्रत्येक गोष्टीकडे सकरात्मकतेच्या दृष्टीने पाहायला हवे. नकारात्मक विचार दूर ठेवून स्वतःला आत्म्याशी जोडून घ्यावे. नैराश्यातून बाहेर येण्यास ‘#व्हायरल_माणुसकी’ हे पुस्तक उपयुक्त ठरते. तंत्रज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे. परंतु त्याचा अत्याधिक वापर आपल्यासाठी घातक आहे, हे समजायला हवे. जेव्हा आपण एखाद्या अधिकाराविषयी बोलतो तेव्हा त्यासोबतच येणाऱ्या कर्तव्यांची जाण असायला हवी. ध्येयपूर्तीसाठी उद्दिष्ट, आवड आणि प्रयत्न करत रहाणे आवश्यक आहे.”
 
वैभव वाघ म्हणाले, “कोरोना काळातील चळवळीतून ‘#व्हायरल_माणुसकी’ पुस्तकाची सुरुवात झाली. आज अनेकदा युवा पिढी नैराश्याने ग्रासलेली दिसते. हेच नैराश्य दूर करायचे असेल, तर प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहावे. या दोन वर्षांच्या कठीण काळातील नकारात्मक वातावरणात घडलेल्या अनेक सकारात्मक गोष्टींचा हा लेखाजोखा आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता अनेक योद्ध्यांनी केलेल्या कार्याची कथा यातून मांडली आहे.”
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *