मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सोडण्यासाठी मंगेश चिवटे यांची शिष्टाई यशस्वी ठरली आणि ७२ तासांच्या संवादी घडामोडीनंतर जरांगे-पाटील यांची उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि राज्याच्या वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारणारे व आरोग्यदूत म्हणून ओळखले जाणारे मंगेश चिवटे आता संवाददूत झाल्याचे पाहायला मिळाले.– प्रतिनिधी, सर्जनशील न्यूज, पुणे
इरेला पेटलेल्या जरांगे-पाटील यांचे उपोषण मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंगेश चिवटेंवर संवादाची जबाबदारी टाकली. त्याचे कारण जरांगे-पाटील आणि मराठा आंदोलक इतर कोणत्याही मंत्र्यांना किंवा राजकीय पुढाऱ्यांना दाद देत नव्हते. इतकेच नव्हे, तर त्यांना उपोषणस्थळी, गावागावांत बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे चिवटे यांच्या माध्यमातून संवादसेतू साधता येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांना होता. ही जबाबदारी मिळताच चिवटे उपोषणस्थळी दाखल झाले. जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंना फोन जोडून दिला. अर्धा तास संवाद झाला. सकारात्मक भूमिका घेत उपोषण मागे घेण्याचा निर्णय झाला आणि चिवटे माघारी फिरले.
पण याआधीचे ७२ तास नेमके कसे होते? यावरही बरीच चर्चा झाली. या ७२ तासांत चिवटे आरोग्यदूताचे आता संवाददूत झाले होते. महाबळेश्वर येथील आगीच्या घटनेत भाजलेल्या आठ बालकांपैकी चौघांवर पुण्यातील सूर्य ह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार चिवटे व त्यांच्या टीमने रात्री एक वाजता हॉस्पिटल प्रशासन व जखमींच्या नातेवाईकांना भेटून तब्येतीची विचारपूस केली. तिथून थेट सांगलीच्या कवठेमहांकाळला झालेल्या अपघातात युवा शिवसैनिक विवेक तेली यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांचे अर्थसहाय्य सुपूर्त केले. तिथून सांगोलामार्गे नाशिकला जाताना शहाजी बापू पाटील यांची भेट घेऊन नाशिकमधील मानवता कँसर हॉस्पिटलमध्ये आयोजित रुग्णांच्या आनंद मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली. गोरगरिबांसाठी नव्याने उभारलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उद्घाटन मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते केले. देवळ्यातील ‘शिवनिश्चल’ या अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या १० व्या वर्धापनदिनास उपस्थिती लावून त्यांचे कौतुक केले. दरम्यान, मंगेश चिवटे जरांगे यांच्या तब्येतीविषयी माहिती घेत होतेच.
नाशिकहून विमानाने नागपूरला व तिथून थेट यवतमाळला ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात ते सहभागी झाले. नंतर हेलिपॅडवर चिवटे यांनी मुख्यमंत्र्यांना जरांगे यांच्यासंदर्भात चर्चा केली. नागपूरहून पुणे आणि पुण्याहून बेळगाव असा नियोजित दौरा होता. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे व सचिव बालाजी खतगावकर यांच्याकडून निरोप आला की, ‘मंगेश तू जालन्यामधील अंतरवाली सराटीला जा. महाराष्ट्रासाठी, मराठ्यांसाठी मनोजदादाचे प्राण वाचणे महत्त्वाचे आहे. आपल्याला मराठा बांधवांसाठी आरक्षण द्यायचेच आहे. परंतु त्यासाठी कालावधी लागणार आहे. स्वतः तातडीने तिकडे जा आणि मनोजदादांना तांत्रिक अडचणी समजून सांग. माझे हे बोलणे करून दे.’
क्षणाचाही विलंब न करता विमानतळावरून बाहेर पडून चिवटे खाजगी वाहनाने थेट अंतरवलीच्या वाटेला लागले. प्रवासात जरांगे यांच्याशी संवाद सुरूच होता. चिवटे यांच्या सहकारी नमूद करतात, ‘रात्रीचे दोन वाजले होते. मोबाईल वाजला. आम्ही गाडी बाजूला घेतली. एकनाथ शिंदे साहेबांचा फोन. मंगेश कुठे आहेस? तू निघाला का?’. ‘साहेब मी प्रवासातच आहे. आता समृद्धी महामार्गाने संभाजीनगर कडे निघालो आहे,’ सांगितल्यावर ‘मंगेश, तू प्रवास सावकाश कर. कोणतीही घाई करू नकोस. संभाजीनगर गाठले की मेसेज कर’ असे शिंदे यांनी उत्तरादाखल सांगितले. ‘जी साहेब, आपण निश्चिंत रहा. मी पहाटेच उपोषणस्थळी जाऊन मनोजदादांची भेट घेतो आणि तुम्हाला कॉल करतो,’ असे मंगेश चिवटे यांनी सांगितले. पुन्हा एकदा प्रवास सुरु झाला. नागपूर येथून घेतलेल्या खाजगी वाहनाच्या चालकाची झोप झालेली नव्हती. मध्येमध्ये चालक गाडी थांबवत तोंड धुवत होता. चिवटे यांच्या ते लक्षात आले. त्यांनी चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगून सहकारी ऋषिकेश देशमुखला विचारले, ‘आपल्याला पहाटेच संभाजीनगर गाठायचे आहे. चालकाला मागे झोपू दे, तू गाडी चालवतो का?’. ऋषीही त्याच तालमीतला. लगेच गाडीची स्टेरिंग हातात घेऊन संभाजीनगरकडे रवाना.
ऋषिकेश म्हणतो, “आम्ही पहाटे पाच वाजता संभाजीनगर येथे पोहोचलो. ३१ ऑक्टोबरचा दिवस. लगेच आंघोळ करून प्रवासाला लागलो होतो. प्रवासात मंगेश सरांची फोनाफोनी चालूच होती. त्यांनी सकाळी सहा वाजताच मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती गायकवाड सर यांना फोन कॉलद्वारे यावर कसा मार्ग काढता येईल? याबाबत चर्चा केली. सकाळी ७ वाजता उपोषण ठिकाणी अंतरवाली सराटी येथे पोहोचलो. मराठा आंदोलकांवर लाठीचार्जची दुर्दैवी घटना घडल्यापासूनच जखमी आंदोलकांची विचारपूस करणे, त्यांच्यावर योग्य उपचार करण्यासाठी शासकीय यंत्रणेला सूचना करणे आदी बाबींमुळे चिवटे सर आधीपासून जरांगे-पाटील यांच्या संपर्कात होते. लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांना तातडीने योग्य ती मदत पोहोचवणे, १४ ऑक्टोबर रोजी जालन्यातील सभास्थळी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलेली भरपाई, सभा आटोपून घरी परतत असताना झालेल्या अपघातांनंतर जखमींना तातडीने केलेले अर्थसाहाय्य आणि आरक्षणाच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करत दिलेल्या वैद्यकीय सेवेमुळे त्यांनी जरांगे पाटील यांचा विश्वास संपादन केलेला होता. मुख्यमंत्री शिंदेच आपल्याला न्याय देतील, असा विश्वास आल्याने आणि चिवटे यांना शिंदेनीच पाठवल्याने जरांगे-पाटील यांनी आम्हाला स्टेजवर बोलवून घेतले. शिष्टमंडळ भेटले. सविस्तर चर्चा केली. जरांगे-पाटील व मुख्यमंत्री शिंदे यांचा संवाद होण्यासाठी चिवटे यांनी स्वतःच्या मोबाईलवरून फोन लावला. जवळपास अर्धा तास सकारात्मक चर्चा झाली. मग आम्ही पुन्हा एकदा संभाजीनगरकडे रवाना झालो. संभाजीनगरवरून मुंबईकडे जाण्यासाठी विमानाचे तिकीट काढणार होतो; पण नियतीच्या मनातही चिवटे सरांच्या माध्यमातून जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, असे असावे. ३१ ऑक्टोबरला संध्याकाळी ना विमान होते, ना ट्रेन होती. आम्ही मुक्काम करायचे ठरवले.”
मुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा चिवटे सरांना कॉल आला. ‘मंगेश, कुठे आहेस तू? आज काय चर्चा झाली? मनोज दादांची काय भूमिका आहे.? प्रामाणिक भावनेने मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज दादांची महाराष्ट्राला गरज आहे. काहीही झाले तरी आपण आरक्षण देणारच आहोत. परंतु त्यांच्या तब्येतीची काळजी वाटते. त्यांना संपूर्ण तांत्रिक अडचण समजून सांग. उपोषण मागे घेण्यासाठी विनंती कर.’
रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा आम्ही जरांगे यांना फोनवरून संपर्क केला. त्यांनी विचारले, ‘कुठे आहे तुम्ही?’ ‘संभाजीनगरमध्येच असल्याचे सांगितल्यावर, ‘पुन्हा आंतरवालीला या आपण चर्चा करू’ असा निरोप दिला. दिवस होता १ नोव्हेंबर २०२३. पुन्हा पहाटे जालन्यामधील अंतरवाली सराटी गाठले. चर्चा केली आणि मनोज दादांचे निरोप येऊन मुंबईकडे निघालो. वाटेत असतानाच ही सर्व चर्चा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कानावर घातली. त्यांनी मुंबईत आल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटून यावर मार्ग काढू सांगितले.
ऋषिकेश पुढे लिहितात, दहा दिवस दौऱ्यावर असल्याने मी मंगेश सरांना घरी जाऊन आराम करा व उद्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन जरांगे-पाटील यांच्याविषयी चर्चा करा, असे सुचवले. मात्र, ‘ऋषी तू आज घरी जा. मी येथूनच थेट वर्षा बंगल्यावर जात आहे.’ मनोजदादांचे प्राण वाचवण्यासाठी शिंदे साहेबांच्या जीवाची तळमळ होत होती आणि त्यांच्या आदेशाने मंगेश सरही प्रयत्नाची पराकाष्ठा करत होते. साहेबांची भेट घेऊन झालेला सर्व घटनाक्रम सरांनी सांगितला. साहेबांनी लागलीच शिष्टमंडळ गठित करून अंतरवली सराटीला पाठवले. दिवस होता २ नोव्हेंबर २०२३. नेहमीप्रमाणे मी मंत्रालयात पोहचलो. कधी येणार आहात विचारण्यासाठी मंगेश सरांना कॉल केला. तर ‘अरे ऋषी, मी पोहोचलो संभाजीनगरला’ उत्तर आले. मला धक्काच बसला. या माणसांमध्ये नक्की एवढी प्रवास करण्याची शक्ती येते कुठून? या दौऱ्यामध्ये असा एकही दिवस गेला नव्हता, आम्ही सहा तास पूर्ण झोप घेतली. तरीही चिवटे सर शिष्टमंडळासमवेत अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले आणि त्यांच्या शिष्टाईला यश आले. मनोजदादानी उपोषण मागे घेतले. ह्या संपूर्ण घटनांचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला मिळाले. दोन महिन्याच्या कालावधीमध्ये संवेदनशील मुख्यमंत्री शिंदे साहेब आम्हा सर्व मराठा बांधवांना न्याय देतीलच, असा विश्वास वाटतो. जरांगे-पाटील यांचा लढा नक्की यशस्वी होणार! तोही शिंदे साहेबांच्या माध्यमातूनच!