शाश्वत गांधी विचार आत्मसात करणे काळाची गरज

शाश्वत गांधी विचार आत्मसात करणे काळाची गरज

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत; डॉ. श्रीपाल सबनीस यांना सहावा ‘सूर्यदत्त गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड’ प्रदान

पुणे : “सबंध जगभरात अराजकतेचे स्तोम माजत आहे. भारतातही अदृश्यपणे हुकूमशाहीचा शिरकाव होत आहे. ‘मी म्हणजेच जर्मनी’ असे हिटलर सांगत असे. त्याप्रमाणेच आज ‘मी म्हणजेच भारत’ असा प्रचार होतो आहे. ही गोष्ट भविष्यात धोकादायक असून, वेळीच भारतीयांना आपल्या हाती असलेल्या मतदानरुपी शस्त्राचा उपयोग करून अराजक माजवू पाहणाऱ्यांना लोकशाही मार्गावर आणायला हवे. या लढाईत सर्वसमावेश, अहिंसाप्रिय आणि सत्याग्रही असा गांधीविचार आश्वासक व मार्गदर्शक आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५४ व्या जयंतीनिमित्त सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन व सूर्यदत्त ग्लोबल पीस रिसर्च फाउंडेशनच्या वतीने आयोजित गांधी सप्ताहाचा समारोप व सहाव्या ‘सूर्यदत्त गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड-२०२३’चे वितरणप्रसंगी डॉ. कुमार सप्तर्षी बोलत होते. डॉ. सप्तर्षी यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गांधींचा पुतळा, सन्मानपत्र, स्कार्फ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया होते. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमाला सौ. ललिता सबनीस, सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, अधिष्ठाता डॉ. प्रतीक्षा वाबळे, संचालक प्रशांत पितालिया, संदीप बर्वे आदी उपस्थित होते.

 
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, “भारत हा वैविध्यपूर्ण देश असून, जगातील सर्व जाती-धर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात. भारतीय हा त्यांचा धर्म आहे. ‘सबका भला हो’ अशी आपली संस्कृती आहे. गांधींच्या नावाने भारताची जगभरात ओळख असून, अनेक समस्यांवर उपाय म्हणून जग भारताकडे पाहते. या देशात आजही गांधी मारण्याचे प्रकार होतात. मात्र, गांधी हा शाश्वत असून, तो दरवर्षी मारूनही मरत नाही. गांधी विचारांचे चैतन्य दिवसेंदिवस व्यापक होत आहे. स्वतःला, भारतीयत्वाला उलगडण्यासाठी गांधी अंगिकारण्याची आणि खरा गांधी देशवासियांना सांगण्याची गरज आहे.”
 
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “साम्राज्यशाही, विषमतेचा विरोध गांधी विचार करतो. सर्वसामान्यांचे आत्मबल वाढवून निर्भयपणे जगण्याची प्रेरणा देणारा हा विचार आहे. जाती-धर्माच्या ऐक्याचा गांधींचा प्रयोग आजही टिकून आहे. स्वावलंबन, ग्रामोद्योग, अहिंसा, सत्याग्रहाची शिकवण, समानतेचा संदेश गांधींनी दिला. कस्तुरबा गांधी यांची त्यांना तितकीच मोलाची साथ राहिली. त्यामुळे कस्तुरबा आणि महात्मा गांधी यांचे जीवन प्रेरणादायी असे आहे. त्यांचे जनकल्याणाचे मॉडेल आदर्श आहे. गांधींच्या विचारांचा प्रभाव जगातील अनेक नेत्यांवर असून, जगभरात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे.”
 
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “गांधीवादी तत्त्वज्ञानाची मांडणी, बंधुतेच्या विचारांची पेरणी आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा विचार देणाऱ्या डॉ. सबनीस यांना यंदाचा पुरस्कार प्रदान करताना आनंद वाटतो. त्यांच्या जाज्वल्य विचारांनी सूर्यदत्त परिवाराला प्रेरित केले आहे. यापूर्वी हा पुरस्कार डॉ. विजय भटकर, अण्णा हजारे, डॉ. कुमार सप्तर्षी, शांतीलाल मुथा, भंवरलाल जैन यांना प्रदान करण्यात आला आहे. गांधी विचार हा अहिंसेचा शाश्वत विचार असून, त्याच विचारांवर सूर्यदत्त गेली २५ वर्षे काम करत आहे. हाच शाश्वत गांधी विचार आत्मसात करणे ही आजच्या काळाची गरज आहे.”
 
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी स्वागत-प्रास्ताविकात ‘सूर्यदत्त’चे कार्य, तसेच ‘सूर्यदत्त गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड’ विषयी माहिती दिली. प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले.
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *