उर्मिला घाणेकर लिखित ‘निमिष’चे बुधवारी प्रकाशन

उर्मिला घाणेकर लिखित ‘निमिष’चे बुधवारी प्रकाशन

पुणे : लेखिका उर्मिला घाणेकर लिखित कॉन्टिनेन्टल प्रकाशन प्रकाशित ‘निमिष’ या लघुकथासंग्रहाचे प्रकाशन येत्या बुधवारी (दि. ४) सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात होणार आहे. लेखिका व पर्यावरण संरक्षक चित्कला कुलकर्णी यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी असणार आहेत.

‘निमिष’ हा उर्मिला घाणेकर यांचा दुसरा लघुकथासंग्रह असून, यापूर्वी त्यांचा ‘तलग’ लघुकथासंग्रह प्रकाशित आहे. ‘तलग’च्या प्रतिसादानंतर त्यांच्या मनात राहिलेल्या अनेक गोष्टी त्यांनी लिहायला घेतल्या आणि ‘निमिष’ची निर्मिती झाली. छोट्या छोट्या कथांमधून जीवन योग्य मार्गाने कसे जगावे, याचाही संदेश त्या देतात. ‘चमत्कार’, ‘अनुश्री’, ‘गैरसमज’, ‘पाणी पुण्याचे’, ‘काकासाहेब’ अशा वाचनीय लघुकथा या पुस्तकात आहेत.

पतीच्या नोकरीनिमित्त पाच राज्यांत सतरा गावांत त्यांचे वास्तव्य झाले. या प्रवासात विविध ठिकाणी राहताना अनेक माणसे भेटली. अनुभव आले. त्यातून त्यांचे जीवन समृद्ध होत गेले. भंडारा येथे असताना तीन वर्षे राष्ट्रसेविका समितीचे काम केले. नागपूर विद्यापीठात काही काळ प्राध्यापकीही केली. निसर्गोपचार व योगाची पदविका पूर्ण करून योग शिक्षिका म्हणूनही त्या कार्यरत राहिल्या. देवगड तालुक्यात बालपण गेलेल्या आणि चांगली परंपरा, संस्कार व गायन-नाट्य कलेचा वारसा लाभलेल्या उर्मिला यांचा हा लघुकथासंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास चिरंजीव अमेय घाणेकर यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *