‘सूर्यदत्त’तर्फे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व तत्रंज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रावरील परिणाम’वर राष्ट्रीय परिषद व ‘सूर्यदत्त धन्वंतरी राष्ट्रीय पुरस्कार २०२३’चे वितरण
पुणे : “तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी माणसाच्या भावस्पर्शाची जागा ते घेऊ शकत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्र अत्याधुनिक होत असले, अनेक उपचार सुलभ होत असले, तरी डॉक्टरांच्या हाताचा स्पर्श रुग्णांना दिलासादायक असतो. त्यामुळे डॉक्टरांनी नवतंत्रज्ञानाचा अंगीकार करत आपल्याला वैद्यकीय सेवेला अधिक व्यापक करायला हवे,” असा सूर राष्ट्रीय परिषदेत उमटला.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थकेअर अँड रिसर्च यांच्यातर्फे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल तत्रंज्ञानाचा वैद्यकशास्त्रावर होणार परिणाम’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे, तसेच वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉक्टरांना सन्मानित करण्यासाठी ‘सूर्यदत्त धन्वंतरी राष्ट्रीय पुरस्कार २०२३’ सोहळ्याचे आयोजन केले होते. ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती आणि योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. कल्याण गंगवाल यांच्या हस्ते डॉक्टरांना धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. संचेती यांना ‘सुर्यरत्न-द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया-२०२३’ पुरस्कार, तर डॉ. विनोद आणि डॉ. गंगवाल यांना ‘सूर्यभूषण ग्लोबल अवॉर्ड २०२३’ प्रदान करण्यात आला.
‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमधील बन्सी-रत्न सभागृहात झालेल्या या सोहळ्यावेळी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, डॉ. किमया गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, अंकित नवलाखा, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, पुणे जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या उपाध्यक्षा डॉ. शुभदा जोशी आदी उपस्थित होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर, डॉ. अनिकेत जोशी, डॉ. सुरेश शिंदे व डॉ. पुष्कर खेर यांनी चर्चासत्रामध्ये आपले विचार मांडले.
डॉ. के. एच संचेती म्हणाले, “वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या डॉक्टरांचा माझ्या हस्ते सन्मान झाला, याचे समाधान वाटते. या सर्वांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. एका रुग्णाच्या वेदना आणि त्याला होणारा त्रास फार काळ लक्षात ठेवता कामा नये. कारण बाकीच्या रुग्णांवरही त्याच ओलाव्याने उपचार करणे आवश्यक असते. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला अत्यंत सकारात्मकपणे भेटणे आवश्यक असते. तंत्रज्ञान कितीही विकसित झाले, तरी डॉक्टर-रुग्णांच्या नात्यातील प्रेमाचा ओलावा कायम राहायला हवा. प्रामाणिक व सचोटीने रुग्णसेवेचा वसा जपला पाहिजे. डॉक्टरांनी माणुसकीचे काम केले तर पुढील पिढ्यांसाठी एक आशादायक जग निर्माण होईल.”
डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले, “ज्याप्रमाणे आई आपल्या पाठीवरून मायेने हात फिरवते, तसाच रुग्णांसाठी डॉक्टरांचा दिलासादायी स्पर्श असतो. त्यामुळे ‘एआय’चा वापर वाढला, तरी भावनिक स्पर्शाची अनुभूती त्याच्याकडून मिळणार नाही. त्यासाठी देवरूपी डॉक्टर हवाच आहे. समाजातील त्यांची आवश्यकता कायम राहणार आहे. माणसाला आयुष्य जगण्यासाठी माणुसकीचे नाते अपरिहार्य असते. हेच माणुसकीचे नाते विद्यार्थ्यांमध्ये जपण्यासाठी ‘सूर्यदत्त’मध्ये असे कार्यक्रम कौतुकास्पद आहेत. झपाट्याने बदलणारे जग आणि वेळेची कमतरता याच्याशी जुळवून घेताना येणारा ताण दूर करण्यासाठी सूर्यदत्त सातत्याने प्रयत्न करीत आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी ही प्रेरणादायी गोष्ट आहे.”
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “डॉक्टरांची पॅथी यापेक्षा डॉक्टरांची सहानुभूती किती महत्वाची आहे, हे दर्शविणारा हा कार्यक्रम आहे. सगळ्या पॅथीचे डॉक्टर एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया डॉ. संजय चोरडिया यांनी केली आहे. तंत्रज्ञानापेक्षा डॉक्टर-रुग्णांचे नाते हे सहानुभूती व भावस्पर्शी असते. तंत्रज्ञान आपल्याला उपचारासाठी मदत करेल, पण डॉक्टरांचा आधाराचा स्पर्श रुग्णाला बरे करण्यात मदत करतो. डॉक्टरांचे चारित्र्यही तितकेच महत्वाचे आहे. केवळ औषधांचा, इंजेक्शनचा मारा न करता सहानुभूतीने, आपुलकीने रुग्णांशी संवाद केला, त्याला मानसिक आधार दिला, तर त्याचा निम्मा आजार बरा होतो. आज इथे आलेले सगळे डॉक्टर्स अशाच स्वरूपाची सेवा करतात, याचा आनंद वाटतो.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “वैद्यकीय क्षेत्र व आरोग्य सुविधा दिवसेंदिवस तंत्रज्ञानाभिमुख व प्रगत होत आहे. कृत्रिम बुद्धिमतेचा वाढता वापर यामुळे वैद्यकीय क्षेत्राचा चेहरामोहरा बदलत आहे. या बदलणाऱ्या परिस्थितीविषयी उहापोह करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन केले. तसेच समाजात देवाचे रूप समजल्या डॉक्टरांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उद्देशाने धन्वंतरी पुरस्कार प्रदान करण्यात आले. सूर्यदत्त संस्था यंदा रौप्य महोत्सव साजरा करत असून, विद्यार्थ्यांना अशा आदर्श व्यक्तिमत्वांकडून शिकता यावे, यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे.”
डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, “डॉक्टरांचा सन्मान आणि सद्यस्थितीवर चर्चा करण्याची कल्पना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी मांडली. सर्वच प्रकारच्या डॉक्टरांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य लोकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ज्यांनी आजवर सेवा केली, अशा ज्येष्ठ व श्रेष्ठ डॉक्टरांचा सन्मान करण्याचा हा सोहळा आहे.”
सन्मानार्थी डॉक्टरांपैकी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूर्यदत्त कॉलेज ऑफ फिजियोथेरपी आणि सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थी व प्राध्यापकानी कार्यक्रमाचे संयोजनासाठी परिश्रम घेतले. वसुंधरा काशीकर-भागवत यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत पितालिया यांनी आभार मानले. डॉ. माधवी जोगळेकर यांनी भक्तीगीत सादर केले.