पुणे : मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनच्या (एमईए) वतीने अदानी समूहामध्ये व्यावसायिक भेटीचे आयोजन केले होते. शरद पवार यांच्या महाराष्ट्रातील उद्योग आणि व्यावसायिकांच्या प्रगतीसाठी असलेल्या तळमळीतून हा दोन दिवसीय दौरा सहभागी झालेल्या विविध स्तरावरील व्यावसायिकांना अनुभव समृद्ध करणारा, तसेच जीवन बदलून टाकणारा ठरला.
या भेटीत ६० पेक्षा अधिक व्यावसायिकांनी अदानी यांचे मुंद्रा येथील पोर्ट, सोलर पॅनल फॅक्टरी, अदानी पॉवर आणि ट्रान्समिशन, अदानी रियल्टी, अदानी लॉजिस्टिक्स, कॉपर आणि अल्युमिनीअम स्मेल्टर या औद्योगिक केंद्रांची माहिती घेतली. पुढील २०-३० वर्षाचे नियोजन आणि त्यामध्ये भारत देशाच्या मूलभूत सोयी सुविधांचा जाणीवपूर्वक केलेला विचार हा अदानी ग्रुपची नव्याने ओळख करून देणारा ठरला. अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यांशी भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले.
अदानी यांनी सहभागी व्यासायिकांना संबोधित करताना त्यांचा व्यावसायिक मित्र म्हणून उल्लेख केला. त्यांच्या व्यवसायातील सुरुवातीचे दिवस, शरद पवार यांच्याबद्दल त्यांच्या मनात असलेली कृतज्ञता यातून जगातील एक धनाढ्य व्यावसायिक असूनही, जमिनीशी पाय घट्ट रोवून असलेला आणि भारताच्या उभारणीची नवस्वप्ने पाहणारा तरुण अशी त्यांची नवी ओळख पाहायला मिळाली.
‘एमईए’चे अरुण निम्हण म्हणाले, यात सहभागी झालेल्या अनेक व्यावसायिकांसाठी हे दोन दिवस अविस्मरणीय ठरले. व्यवसायाकडे वेगळ्या नजरेतून पाहायला शिकण्याची संधी मिळाली. गौतम अदानी यांनी केलेले आदरातिथ्य आणि पवार साहेबानी उपलब्ध करून दिलेली संधी आम्हाला समृद्ध केले.”