विद्यार्थीप्रिय शिक्षक, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ पिंटो यांचे निधन

विद्यार्थीप्रिय शिक्षक, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ पिंटो यांचे निधन

पुणे, ता. २९ : ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्तपत्र विद्या क्षेत्रातील ख्यातनाम प्राध्यापक, विद्यार्थीप्रिय शिक्षक जोसेफ पिंटो यांचे अल्पशा आजाराने शनिवारी पहाटे पुण्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन भाऊ व एक बहीण, तसेच पत्नी व कन्या, जावई असा परिवार आहे.

दीपक फर्टिलायझर्समध्ये काही काळ वरिष्ठ पदावर नोकरी केल्यानंतर ज्यो पिंटो यांनी वृत्तपत्र क्षेत्रात आपला ठसा उमटविला. सुरुवातीला संडे ऑब्झर्व्हर या दैनिकात काम केल्यानंतर त्यांनी गोमंतक टाईम्स व महाराष्ट्र हेरॉल्ड या दैनिकांमध्ये मुख्य संपादक म्हणून काम केले.
 
संपादकीय क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या पिंटो यांनी वृत्तपत्र विद्या क्षेत्रात ज्ञानदानाचेही कार्य केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागासह (रानडे इन्स्टिट्यूट), सिंबायोसिस महाविद्यालय, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, नानासाहेब परुळेकर महाविद्यालय इत्यादी अनेक वृत्तपत्र विद्या महाविद्यालयांमध्ये शिस्तप्रिय परंतु अतिशय लोकप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले विद्यार्थी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम करत आहेत.
 
पिंटो यांनी स्वतःच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच लोकविज्ञान संघटना या संस्थेमार्फत सामाजिक कार्य केले. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी वृत्तपत्र क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, त्यांचे विद्यार्थी व स्नेहीजन उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागासह पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठान यांच्या वतीने पिंटो यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *