सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये
राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
पुणे : राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. बावधन येथील सूर्यदत्त ग्रुप इन्स्टिट्यूट्समध्ये आयोजित शिबिरात ६० जणांनी रक्तदान केले. ‘सूर्यदत्त’चे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह फिजीओथेरपी, एमबीए, एमसीए व इतर विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या प्रेरणेतून उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सूर्यदत्त कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्या डॉ. सीमी रेठरेकर, डॉ. श्रीकांत म्हसे, डॉ. अंजली शर्मा, डॉ. रुचा वैद्य, डॉ. मधुरिका काटे, डॉ. इशानी गोपियानी आदी उपस्थित होते.
डॉ. सीमी रेठरेकर यांनी सर्व डॉक्टर आणि आरोग्य सेवा पुरवणाऱ्या घटकांचे कौतुक केले. लोकांच्या जीवनात डॉक्टरांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांनी गौरवावोद्गार काढले. डॉक्टर व आरोग्य सेवा देणारे सर्वजण समाजाची सेवा करत असून, जगातील महान सेवा क्षेत्राशी आपण संबंधित आहोत, याचा अभिमान बाळगला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “गेल्या दोन दशकांपासून ‘सूर्यदत्त’मध्ये विविध प्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यानिमित्त तयार होणाऱ्या रक्तदात्यांच्या यादीत रक्तदात्याचे नाव, रक्तगट, संपर्क क्रमांक आदी माहिती असते. ही माहिती ‘सूर्यदत्त’च्या आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर दिली जाते. जेव्हा कोणाला रक्ताची गरज भासेल, तेव्हा रक्त उपलब्ध होण्यास याची मदत होते. रक्तदान हे जीवदान असून, प्रत्येकाने रक्तदान करायला हवे.”