पुणे : भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या मान्यतेने भारत गौरव रत्न श्री सन्मान परिषदेच्या वतीने पुण्यातील उद्योजक महेश शरद शेंडगे यांना ‘भारत गौरव रत्नश्री’ पुरस्काराने नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र व शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.
महेश शरद शेंडगे मेघा ट्रेडर्स आणि मुक्ता ट्रेडचे संस्थापक आहेत. गेल्या तीस वर्षांपासून ते व्यवसाय करत असून अप्पा बळवंत चौकात स्टेशनरी आणि डिस्ट्रीब्यूटरशिप चालवत आहेत. अतिशय कष्टातून आणि शून्यातून वाटचाल करत शेंडगे यांनी आपला व्यवसाय वाढवला आहे. या व्यवसायात त्यांना पत्नी, मुलगा, मुलगी व सून यांची चांगली साथ लाभत आहे. त्यांचा हा व्यवसाय महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही विस्तारला आहे.
आयपीएस अधिकारी कारागृह अधीक्षक भीमसैन मुकुंद व छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ पनवेलचे कुलगुरू प्रा. डॉ. अमरेंद्र कुमार सिन्हा यांच्या हस्ते शेंडगे यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन, खासदार मीनाक्षी लेखी, अनिल कुमार चौधरी, फगणसिंग, भारती धुभाई शिवाल, अंजुम चोप्रा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी महेश शेंडगे म्हणाले, मला आनंद आहे की, हा पुरस्कार मला मिळाला आहे. आपण माझ्या कष्टाची दखल घेतली आहे. माझ्या उद्योग कार्याला व पुढील वाटचालीस यामुळे प्रोत्साहन मिळाले आहे. यापुढेही मी अधिक चांगले काम करत राहीन.”