पुणे : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व इंडियन डेंटल असोसिएशनच्या वुमेन कौन्सिलतर्फे वारकरी बांधवांसाठी मोफत दंत व तोंडाचा कर्करोग तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत व पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले, सोनलक्ष्मी घाग, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाठ, प्रभारी विजयसिंह चौधरी आदी उपस्थित होते.
काँग्रेस भवनच्या आवारात झालेल्या या शिबिरात शेकडो वारकऱ्यांनी दातांची, तसेच तोंडाच्या कर्करोगाची तपासणी करून घेतली. युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव ऋत्विक धनवट व डॉक्टर सेलच्या अध्यक्षा मनिषा गरूड यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन केले होते. स्वप्नील नाईक, संतोष पाटोळे, वाहिद नीलगार, ऋणेश कांबळे, प्रसाद वाघमारे आदींनी शिबिराच्या यशस्वितेत परिश्रम घेतले.
कुणाल राऊत म्हणाले, “खेड्यापाड्यातून आलेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे चांगले काम युवक काँग्रेसकडून केले जात आहे. वारकऱ्यांच्या मौखिक आरोग्याच्या दृष्टीने हे शिबीर महत्वाचे आहे. दातांची निगा राखण्यासह व्यसनमुक्तीच्या कार्यात हा उपक्रम उपयुक्त ठरेल.”
अरविंद शिंदे म्हणाले, “पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पाणी, खाद्यपदार्थ, आरोग्य सेवा व फिरती स्वच्छतागृहे पुरविण्याचे नियोजन काँग्रेस व युवक काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आले आहे. पांडुरंगाची सेवा करण्याचे भाग्य सर्व कार्यकर्त्यांना लाभत आहे.” ऋत्विक धनवट यांनी शिबिराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.