तीस वर्षात एक कोटी वृक्षारोपण पूर्तीचे समाधान
ट्री-मॅन विष्णू लांबा यांची भावना; पर्यावरण दिनानिमित्त तळजाई वनक्षेत्रात वृक्षारोपण
पुणे : “वयाच्या सातव्या वर्षांपासून झाड लावण्यास सुरुवात केली. पर्यावरण संवर्धनासाठी झपाटून काम करताना यंदा वृक्षारोपणाच्या या कार्याला ३० वर्षे पूर्ण होत असून, गेल्या ३० वर्षांत एक कोटी झाडे लावल्याचे समाधान आहे. २०४७ पर्यंत भारताच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होताना पाच कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट्य आहे,” अशी भावना ट्री-मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा यांनी व्यक्त केली. श्री कल्पतरू संस्थानच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळजाई वनक्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी विष्णू लांबा बोलत होते. प्रसंगी कल्पतरू संस्थानच्या समन्वयिका उमा व्यास, रेश्मा पालवे, भागाबाई चोले आदी उपस्थित होते.
‘ट्री-मॅन ऑफ इंडिया’ अशा उपाधीने प्रसिद्ध विष्णु लांबा यांनी गेल्या ३० वर्षात श्री कल्पतरू संस्थानच्या माध्यमातून एक कोटी वृक्ष लावण्याचे लक्ष्य पूर्ण केले. या निमित्ताने संयुक्त राष्ट्राचे पर्यावरण उपक्रमाचे सहावे प्रमुख एरिक सोलहेम यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे शुभेच्छा देत भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे. पाच हजार वर्षांची परंपरा असलेल्या ‘देवराई’ संकल्पनेला पुढे घेऊन जाण्याचे काम विष्णू लांबा करत आहेत. देशाच्या विविध भागात लाखो वृक्षारोपण कार्यक्रमातून त्यांनी एक कोटी झाडे लावण्याचा विक्रम केला आहे. देशी झाडे लावून पर्यावरण संवर्धनात योगदान दिले आहे.
विष्णू लांबा म्हणाले, “संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार विश्वात १० लाख वृक्ष आणि पशु-पक्षांच्या जाती लुप्त होत आहेत. हे आव्हान समोर ठेवून श्री कल्पतरू संस्थानने देशभर देशी वृक्षांचे जंगल लावण्याचे अभियान हाती घेतले आहे. राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, तेलंगाना, आंध्र प्रदेश, ओडिशा आदी राज्यांमध्ये जंगल निर्मितीचे काम सुरु आहे. पुण्यात तळजाई टेकडीवर पाच एकर जागेत १२ हजार वृक्षांचे रोपण करून ‘ग्रीन लंग्ज’ नावाचे मानवनिर्मित जंगल गेल्या वर्षी तयार करण्यात आले आहे.”
‘पौधाचोर’ ते ‘ट्री-मॅन ऑफ इंडिया’ हा लांबा यांचा प्रवास थक्क करणारा आहे. लहानपणापासून घर-दार सोडून पर्यावरण संवर्धनात झोकून दिले आहे. आदर्श शाळेप्रमाणे आदर्श गावाचे स्वप्न पाहून त्या दृष्टीने ते गावांमध्येही अनेक उपक्रम राबवत आहेत. श्री कल्पतरू संस्थानच्या माध्यमातून लोकांना इको फ्रैंडली रोज़गार उपलब्ध करून दिला जात आहे. देशातील १०० गावांना आदर्श बनवून पाच कोटी वृक्ष लावत त्यांना संरक्षित करण्याचे ध्येय त्यांचे आहे. या प्रवासात त्यांना अनेकदा लढा द्यावा लागला, हल्ले सहन करावे लागले, न्यायालयात जावे लागले. जवळजवळ १३ लाख वृक्षांना न्यायालयीन लढाईत त्यांनी वाचवले. २३ लाख रोपे तयार करून त्याचे वाटप केले. तर ६४ लाख झाडे त्यांनी स्वतः लावले आहेत.
राजीव गांधी पर्यावरण पुरस्कार, डॉ. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय निर्माण पुरस्कार, अमृता देवी विश्नोई पुरस्कार, ग्रीन आयडल अवार्ड असे एकूण १५० पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना आजवर मिळाले आहे. त्यांच्या या कार्याची दखल विश्वस्तरावर घेतली गेली आहे. संयुक्त राष्ट्राचे संचालक एरिक सोलहेम यांनी अनेकदा ट्विट करून या कार्याचा गौरव केला आहे. आज १३ देशांत भारताच्या २२ राज्यांत संस्थेचे निःस्वार्थी कार्य सुरू असून, साडेसात लाख स्वयंसेवक सेवा देत आहेत. कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय हे कार्य सुरु आहे, हेही विशेष. यासोबतच पक्ष्यांसाठी घरटे व पाण्याचे पॉट वितरित करण्याचेही काम संस्थेद्वारे सुरू आहे.