एसपीएम पब्लिक स्कूलमध्ये आता अकरावी आणि बारावी चे वर्ग
सीबीएसई बोर्ड कडून मान्यता ; शिक्षण प्रसारक मंडळी संस्थांतर्फे आयपीई सेंटर अंतर्गत जेईई /नीट/एम एच टी- सीईटी प्रशिक्षण केंद्राची देखील सुरुवात
पुणे : शिक्षण प्रसारक मंडळीच्या एसपीएम पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (SPM Public School) पूर्व प्राथमिक ते दहावी पर्यंतच्या शिक्षणासोबतच आता इयत्ता अकरावी आणि बारावीचे वर्ग देखील सुरु होत आहेत. सीबीएसई बोर्ड कडून याकरिता मान्यता मिळाली असून शहराच्या मध्यभागात पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंत वर्ग एकाच इमारतीमध्ये असणारी ही एकमेव सीएबीएसई मान्यताप्राप्त दर्जेदार शाळा आहे, अशी माहिती शि.प्र.मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन (SK Jain) यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला नियामक मंडळ उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, शाला समिती अध्यक्ष सतिश पवार, शाळेच्या प्राचार्या डॉ.अपर्णा मॉरिस यांसह नियामक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
सतिश पवार म्हणाले, सन १८८८ मध्ये स्थापन झालेल्या शिक्षण प्रसारक मंडळीला १३४ वर्षांची यशस्वी परंपरा आहे. शि.प्र.मंडळी कार्यालया शेजारी स्थित शाळेच्या मुख्य इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर इयत्ता ११ वी व १२ वी चे वर्ग सुरु होणार असून सिनीयर सेकंडरी विभाग म्हणजे ज्यूनियर कॉलेज मधील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेचे शिक्षण सर्व अद्ययावत सुविधांसह मिळणार आहे.
डॉ. अपर्णा मॉरिस म्हणाल्या, शहराच्या मध्यवर्ती भागात एक दर्जेदार सीबीएसई स्कूल ची पोकळी शाळेने भरुन काढली आहे. सन २०१० मध्ये २२ विद्यार्थ्यांपासून झालेली सुरुवात आज १९५२ विद्यार्थी संख्येपर्यंत पोहोचली आहे. यंदा दहावीची पहिली बॅच शंभर टक्के निकालासह उत्तीर्ण झाली असून त्यापार्श्वभूमीवर आता सिनीयर सेकंडरीचे शिक्षण देखील याच इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
*शि.प्र.मंडळी तर्फे जेईई/नीट/सीईटी चे प्रशिक्षण केंद्र
शि.प्र.मंडळी तर्फे सीबीएसई विभागाच्या इमारतीमध्ये जेईई/नीट/एमएचटी-सीईटी/आयआयटी फाऊंडेशन साठी आयपीइ (इन परस्युट आॅफ एक्सलन्स) प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यात येत आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, उच्चविद्याविभूषित शिक्षक यांच्याकडून शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
सर्व प्रकारच्या सामाजिक व आर्थिक गटातील विद्यार्थ्यांना समाविष्ट होता येईल, ही गोष्ट समोर ठेऊन शुल्क रचना देखील करण्यात आली आहे. जेईई आणि नीट चे अभ्यासक्रम पूर्ण करुन अभियांत्रिकी आणि आरोग्य क्षेत्रातील करिअरच्या वाटा विद्यार्थ्यांसाठी खुल्या होणार आहेत. त्याकरिता अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन व समुपदेशन विद्यार्थ्यांना मिळेल, असे अॅड.एस.के.जैन यांनी सांगितले.
डॉ.अपर्णा मॉरिस म्हणाल्या, शिक्षण प्रसारक मंडळीच्या आयपीई प्रशिक्षण केंद्रांतर्गत इयत्ता ८वी, ९वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता फाऊंडेशन कोर्स सुरु करण्यात येणार आहे. याद्वारे शालेय वयातच विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होईल. तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी यश संपादन करु शकतील, हा यामागील उद्देश आहे.