पुणे : ‘कर्करोगाच्या रुग्णांवर वेदनाशामक उपचार (पॅलिएटिव्ह केअर) प्रभावीपणे होण्यासाठी पुण्यातील मुकुल माधव फाऊंडेशन आणि गंगा प्रेम हॉस्पिस यांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत उत्तराखंडमधील डेहराडून, ऋषिकेश, हरिद्वार येथे कर्करोगाच्या रुग्णांना ‘पॅलिएटिव्ह केअर’ सुविधेचा लाभ घेता येणार आहे. मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने गंगा प्रेम हॉस्पीसला पॅलिएटिव्ह केअर युनिट वाहन सुपूर्द करण्यात आले. गेल्या वर्षी तमिळनाडूतील कन्याकुमारी येथे श्रीराम कॅन्सर ट्रस्टच्या माध्यमातून अशाच एका युनिटला मदत करण्यात आली होती.
ऋषिकेश (उत्तराखंड) येथे झालेल्या कार्यक्रमावेळी गंगा प्रेम हॉस्पिसचे वैद्यकीय संचालक ए. के. दिवाण, श्रद्धा कॅन्सर केअर ट्रस्टच्या संस्थापक विश्वस्त डॉ. रुपाली दिवाण, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे महाव्यवस्थापक (विक्री-रिटेल/प्रोजेक्ट) अरुण ओझा, गंगा प्रेम हॉस्पिसच्या चीफ ऑफ ऑपरेशन्स पूजा डोगरा, विश्वस्त व आध्यात्मिक सल्लागार नानी माँ आणि ऋषिकेशमधील आरोग्यधाम येथील पुरस्कारप्राप्त आयुर्वेद डॉक्टर अमृत राज यांच्यासह मुकुल माधव फाउंडेशनचे हितचिंतक, पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळात रुग्णांची सदैव काळजी घेण्याच्या व त्यांना आधार देण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक पाऊल आहे.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाबद्दल बोलताना मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “गंगा प्रेम हॉस्पिसला पॅलिएटिव्ह केअर युनिट वाहन सुविधा पुरविण्याची संधी मिळणे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. गेल्या १२ वर्षांपासून समर्पित भावनेने त्यांनी केलेले उल्लेखनीय काम प्रेरक आहे. पॅलिएटिव्ह केअर युनिट वाहनासह मुकुल माधव फाऊंडेशनने रुग्ण आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांसाठी १८५० छोटे रेशन किट आणि चादरी दिल्या आहेत. सहकार्य भावनेवर फाउंडेशनचा नेहमीच विश्वास राहिला असून, या उपक्रमांत सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार व्यक्त करावेसे वाटतात.
“आमचे मूळ असलेले हरिद्वार माझ्यासाठी खूप विशेष आहे. माझ्या आजीसह आमच्या पूर्वजांच्या अनेक आठवणी मला इथे परत घेऊन येतात. इथे धार्मिक विधीमध्ये बराच वेळ घालवलेला आहे. गंगेचा थंडगार परिसर, पुरी भाजीचा आस्वाद, बाजारात मनसोक्त फिरण्यासह सिंधूरच्या डोंगर आणि पायऱ्यांवर झगमगणारे दिवे पाहिले आहेत. या सगळ्या आठवणींसह मला मला पुन्हा सेवेची आणि माझ्या पूर्वजांचा वारसा चालवण्याची संधी मिळाली आहे,” अशा शब्दात छाब्रिया यांनी आठवणींना उजाळा दिला.
सामाजिक कार्याचा रौप्य महोत्सव
१९९९ मध्ये स्थापन झालेल्या मुकुल माधव फाऊंडेशन (एमएमएफ) यंदा सामाजिक कार्याचा रौप्य महोत्सव साजरा करत आहे. गेल्या २५ वर्षांत मुकुल माधव फाउंडेशनने देशभरात आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, जलसंधारण, कौशल्य विकास या क्षेत्रात भरीव काम केले आहे. समाजातील वंचित घटकांच्या, महिलांच्या सक्षमीकरणात बहुमोल योगदान दिले आहे. गरीब व गरजू रुग्णांना, विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य पुरवले आहे. सामाजिक जाणिवेतून सुरु असलेले हे कार्य सर्वांसाठी आदर्शवत असेच आहे.