शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधान अंतर्भूत करावे

शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधान अंतर्भूत करावे

अविनाश महातेकर यांचे मत; ‘रिपाइं’, सम्यक ट्रस्ट व संविधान समितीतर्फे बाईक रॅली व व्याख्यान
 
पुणे : “संविधानाने भारताचे अखंडत्व जपले आहे. प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देणाऱ्या संविधानाला अबाधित ठेवण्याचे दायित्व आपल्यावर आहे. संविधानाचे महत्व आणि त्याबाबत जागृती होण्यासाठी भारतीय संविधान शालेय अभ्यासक्रमात अंतर्भूत करावे,” असे मत ज्येष्ठ साहित्यिक व माजी समाजकल्याण राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी व्यक्त केले.
 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), सम्यक ट्रस्ट व संविधान सन्मान समितीच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर पासून बाईक रॅलीचे आयोजन केले होते. पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे बाईक रॅलीचा समारोप महातेकर यांच्या व्याख्यानाने झाला. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
 
प्रसंगी ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, सचिव महिपाल वाघमारे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रोहिदास गायकवाड, एम. बी. वाघमारे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, असित गांगुर्डे, ऍड. मंदार जोशी, निलेश अल्हाट, बाबुराव घाडगे, संजय सोनवणे, मोहन जगताप, विरेन साठे, श्याम सदाफुले, संगमित्रा गायकवाड, शशिकला वाघमारे, निलेश रोकडे, अक्षय गायकवाड, आनंद लवटे, जयदेव रंधवे, महादेव साळवे आदी उपस्थित होते.
 
अविनाश महातेकर म्हणाले, “संविधानाने विषमता, अस्पृश्यता संपवण्याचे काम केले. तळागाळातल्या लोकांना शिकण्याचा, मतदानाचा अधिकार दिला. राजकीय प्रतिनिधित्व करण्याचा हक्क दिला. संविधानाला हात लावण्याची हिम्मत कोणीही करू नये. युनोने देखील संविधानाच्या आधारावर भारताला मदतीला हात दिलेला आहे. त्यामुळे संविधान कोणीही बदलू शकत नाही. संविधानातल्या तरतुदी पाळण्याचे, त्याचे स्थान अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे.”
 
शैलेंद्र चव्हाण अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब जानराव यांनी प्रास्ताविक केले. महिपाल वाघमारे, दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. श्याम सदाफुले यांनी आभार मानले.
———————–
बाईक रॅलीत हजारोंचा सहभाग
संविधान दिनानिमित्त आयोजित बाईक रॅलीत हजारो लोक सहभागी झाले. बालगंधर्व रंगमंदिर पासून ही बाईक रॅली निघाली. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून टिळक चौकातून कुमठेकर रस्ता, शनिवारवाडा, जुना बाजार, मालधक्का, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशी ही रॅली झाली. संविधान जागृती करणारा रथ, फलक आणि तिरंगी, निळे झेंडे लक्ष वेधून घेत होते. ‘जातीयतेच्या बेड्या तोडू, संविधानाने भारत जोडू’, ‘सर्वांचा एकच निर्धार, संविधानाचा स्वीकार’, ‘वंचितांना देई उभारी, भारतीय संविधान लय भारी’, ‘विवेक पसरवू जनाजनात, संविधान जागवू मनामनात’, ‘संविधान एक परिभाषा है, मानवता की आशा है’ अशा उद्घोषणांनी बाईक रॅलीतून जनजागृती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *