भरत लिम्हण यांचा सल्ला; विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये पारितोषिक वितरण
पुणे : “खेळात संघर्ष असल्याने आयुष्यात आलेल्या संकटांवर मात करता येते. त्यामुळे खेळ खेळायला हवेत. हार जीत यापेक्षा स्पर्धेत सहभागी होणे फार महत्वाचे असते. त्यातूनच आवड आणि त्यादृष्टीने तयार होणारे विचार आवश्यक ठरतात. माणसाला सर्वोत्तम होण्यासाठी शिक्षण, खेळ आणि कलागुण या तिन्हींची सांगड गरजेची असते. तसेच त्याला कष्टाची जोड द्यायला हवी,” असा सल्ला अभिनेता व कुस्तीपटू भरत लिम्हण यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या विद्यार्थी विकास केंद्रांतर्गत आयोजित वार्षिक सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण लिम्हण यांच्या हस्ते झाले. लजपतराय विद्यार्थी भवन येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी युट्यूबर जीवन कदम, वसतीगृह समन्वयक कुंदन पठारे, समितीच्या कार्यकर्त्या अरुणा अत्रे, पर्यवेक्षक विद्या सूर्यवंशी, सचिन मोकाशे, प्रवीण भोवते आदी उपस्थित होते. अभिषेक आठवले याने सूत्रसंचालन केले. परवीन आतार हिने आभार मानले.
वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन, काव्यवाचन, इंग्रजी प्रेझेंटेशन, १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, गोळा फेक, बुद्धीबळ, कॅरम, बॅडमिंटन, दोरी उड्या, क्रिकेट अशा विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. यासह उत्कृष्ट नेतृत्व, उत्कृष्ट व्यवस्थापन व आदर्श विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांचा गौरव झाला. इंग्रजी प्रेझेंटेशनमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या सुमित्रा सदन वसतिगृहाला समितीची फिरती ढाल देण्यात आली. नेतृत्वगुणासाठी प्रतीक रेणुकादास व पल्लवी जाधव यांना, तर आदर्श विद्यार्थी म्हणून नंदकिशोर घुगे, सोहम दरेकर, सोनू राठोड व अस्मिता शिंदे यांना गौरविण्यात आले.
भरत लिमन म्हणाले, “शिक्षणाने माणूस हुशार, तर खेळाने सुदृढ होतो. अनेकांना व्यायामाचा कंटाळा येतो. पण खेळ खेळताना तुम्हाला व्यायामाला पर्याय नसतो. शरीरावर, मनावर मेहनत घेतली तर यश कमावता येते. अपयश बघणाऱ्याची मानसिकता सशक्त असते. बाहेरच्या जगात वावरायचे असेल, तर शिक्षण महत्वाचे आहे. थोडक्यात समाधान मानू नका, थांबू नका. परिश्रम करत राहा. यश नक्की मिळणार!”
जीवन कदम म्हणाले, “स्वतःला ओळखायला शिका. मातीशी नाते कायम ठेवा. अनुभव, निरीक्षणातून शिका. अभ्यासातील, खेळातील सातत्य ठेवा. यशाने हुरळून न जाता आणि अपयशाने खचून न जाता जिद्दीने प्रयत्न करत राहा. या प्रवासात तुम्हाला समिती मदतीचा हात देते आहे. समितीचे संस्कार, ऋण कायम स्मरणात ठेवा. आत्मविश्वासाने वाटचाल करा आणि इतरांना प्रेरित करा.”