यंदाचा महोत्सव गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना समर्पित
दिग्गज कलाकारांसह सूर व तालाची मिळणार मेजवानी
पं. शौनक अभिषेकी यांना ‘संस्कृती कलागौरव पुरस्कार २०२२’
सांगीतिक पर्वणी बरोबर हास्याचा चढणार फुलोरा
पुणे, दि. १६ एप्रिल २०२२ : सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यातील एक अत्यंत लोकप्रिय व महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सवा’चे यंदा तपपूर्ती वर्ष आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महोत्सवाचे यंदा १२ वे वर्ष आहे. कोरोनाच्या भयंकर काळानंतर पुन्हा आनंदाची लहर घेऊन आलेल्या या महोत्सवात यंदा रसिकांना हास्यकल्लोळ, दिग्गज कलाकारांद्वारे गानसरस्वती लता मंगेशकर यांची स्मरणयात्रा तसेच ‘तालब्रह्म’ची प्रचिती घेता येणार आहे.
यंदाचा महोत्सव मंगळवार दि. १९ ते शुक्रवार २२ एप्रिल २०२२ दरम्यान कोथरूड मधील आयडियल कॉलनी मैदान येथे सायंकाळी साडे सहा वाजता रंगणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे प्रमुख पुण्याचे मा. महापौर मुरलीधर मोहोळ आणि प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी संयोजन समिती सदस्य योगेश देशपांडे, विनोद सातव आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी पुनीत बालन ग्रुप, बढेकर ग्रुप, गोखले कन्स्ट्रक्शन, रावेतकर हौसिंग ग्रुप, रांजेकर बिल्डर्स, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि., बुलढाणा अर्बन बँक लि., सुहाना मसाले, पी. एन.जी. ज्वेलर्स यांचे सहकार्य लाभले आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (दि. १९) माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन होणार असून, याच दिवशी ज्येष्ठ गायक पं. शौनक अभिषेकी यांना ‘संस्कृती कलागौरव पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी उपस्थित राहणार आहेत. या दिवसाचा उत्तरार्ध हास्य फुलोऱ्यांनी रंगणार आहे. प्रसिद्ध विनोदी मालिका ‘चला हवा येऊ द्या’ चे कलाकार यावेळी साधारीकरण करणार असून यात स्वप्नील जोशी, निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सारंग कारंडे, भारत गणेशपुरे व अन्य कलाकार सहभागी होणार आहेत.
दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी (दि. २० व दि. २१) गानसरस्वती भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देत ‘लतादीदी एक स्मरणयात्रा’ या कार्यक्रमाद्वारे सुरांजली अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून संपूर्ण प्रवासाच्या आठवणी व आठ दशकांतील लता मंगेशकर यांनी गायलेली व स्वरबद्ध केलेली मराठी गाणी रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ. सलील कुलकर्णी असून ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री आर्या आंबेकर, सावनी रवींद्र, विभावरी आपटे, शरयू दाते, अनिरुद्ध जोशी, प्राजक्ता जोशी-रानडे, प्रियांका बर्वे, प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक आदी सहभागी होणार आहेत.
महोत्सवाचा समारोप शुक्रवारी (दि. २२) ‘तालब्रह्म’ या भारतीय शास्त्रीय गायन व वादनाच्या जुगलबंदीच्या अनोख्या आविष्काराने होणार आहे. यावेळी तालवाद्यांचे जादूगार उस्ताद तौफिक कुरेशी, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती, प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरसिया, सतार वादक पुरबायान चॅटर्जी, ज्येष्ठ तबलावादक पं.रामदास पळसुले यांच्या कलांचा आस्वाद रसिकांना मिळणार आहे.