रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजच्या पुढाकारातून ससून रुग्णालयात उभारणी;
डॉ. समीर जोशी व पुष्कराज मुळे यांची पत्रकार परिषदेत माहिती
पुणे : महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयातील पहिले ‘व्हॉइस अँड स्पीच डायग्नोस्टिक अँड रिहॅब क्लिनिक’ पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागामध्ये सुरु होत आहे. या क्लिनिकचे लोकार्पण येत्या गुरुवारी (दि. ७ एप्रिल) होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे प्रांतपाल पंकज शहा, तर विशेष अतिथी म्हणून तायकिशा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत मकवाना उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ससून सर्वोपचार रुग्णालयातील ‘ईएनटी’ विभागाचे प्रमुख डॉ. समीर जोशी, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजचे अध्यक्ष पुष्कराज मुळे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत दिली. रोटरीच्या सचिव रुपाली बजाज, रोटरी फाउंडेशनच्या मीना घळसासी, प्रोजेक्ट डायरेक्टर विवेक कुलकर्णी, असिस्टंट गव्हर्नर धनश्री जोग आदी उपस्थित होते.
डॉ. समीर जोशी म्हणाले, “रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज व इतर काही संस्थांनी एकत्रित येत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ७० लाखांच्या निधीतून हे क्लिनिक उभारले आहे. सरकारी रुग्णालयांत असे उपचार प्रथमच उपलब्ध होणार आहेत. आर्थिक मागास प्रवर्गातील लोकांना याचा लाभ होणार असून, तोतरे बोलणारी मुलं, आवाजावर परिणाम होणाऱ्या विविध घटकांतील लोकं उदा: फेरीवाले, कलाकार, गायक, शिक्षक, इत्यादी तसेच बोलण्यात अडचणी असणाऱ्या विविध व्यक्ती व कर्णबधिर मुलं या क्लिनिकमध्ये उपचार घेऊ शकतील. याचबरोबर घशाच्या कॅन्सरचे प्राथमिक अवस्थेत असताना निदान होणे शक्य होणार आहे. अतिशय आधुनिक यंत्र प्रणाली येथे बसविण्यात आली असून, तपासणी व त्याला अनुसरून स्पीच थेरपी, शस्त्रक्रिया किंवा अन्य उपचार करता येणार आहेत.”
पुष्कराज मुळे म्हणाले, “ग्लोबल ग्रांट प्रोजेक्ट अंतर्गत ‘रोटरी सक्षम २.०’ उपक्रमात रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज यांच्या पुढाकारातून हे क्लिनिक उभारण्यात आले आहे. पाच खंडातील दानशूरांनी एकत्र येत हा प्रकल्प साकारला आहे. रोटरी क्लब ऑफ बिक्रॉफ्ट (ऑस्ट्रेलिया), रोटरी क्लब ऑफ पेलोटास सुलेस्ते (ब्राझील), रोटरी क्लब ऑफ कम्पाला नॉर्थ (युगांडा), रोटरी क्लब ऑफ इस्ट नसाऊ (बहामास) यांच्यासह पुण्यातील रोटरी क्लब ऑफ सहवास, रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडा, रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्क, रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज, रोटरी क्लब ऑफ पूना डाउनटाऊन हे ह्या प्रकल्पाचे सहयोगी आहेत. तसेच श्री. नटवरलाल मकवाना यांच्या स्मरणार्थ हे क्लिनिक उभारण्यासाठी ‘तायकिशा इंडिया’ यांनी भरीव मदत केली आहे.”
“जानेवारी २०२० मध्ये या प्रकल्पाची गरज जाणवली. ऑक्टोबर २०२१ मध्ये रोटरी फाउंडेशनने याला मान्यता दिल्यानंतर काम सुरु झाले. या संदर्भात ससून रुग्णालयाशी सामंजस्य करार करून पहिल्या तीन वर्षांची देखभाल व दुरुस्ती रोटरी क्लब करणार आहे व पुढील जवाबदारी ससून रुग्णालयाने घेतली आहे. तसेच या उपचारांची गरज व उपचारांची उपलब्धता ह्याच्या जागृतीसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.”