खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे मत; ‘रिस्पेक्ट सन्मान सोहळा’ उत्साहात
पुणे : “आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणाचे चित्रण करण्याचे काम फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर करतात. त्यांच्या नजरेतून टिपलेला प्रत्येक क्षण यादगार बनतो. त्यामुळे फोटोग्राफर्सनी आपल्यातील सर्जनशीलतेला उपक्रमशीलता आणि डिजिटल माध्यमाची जोड द्यावी,” असे मत खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
रिस्पेक्ट फाउंडेशन ऑफ वेडिंग फोटोग्राफर्स, महाराष्ट्र यांच्यातर्फे चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात ‘रिस्पेक्ट सन्मान’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी ‘मिशन माणुसकी’चे संस्थापक लोकशाहीर संभाजी भगत, ज्येष्ठ फोटोग्राफर रंजन झिंगाडे, पुणे फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय काप्रे, फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन भोर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “कोणत्याही कार्यक्रमाची शोभा वाढविण्याचे काम चित्रण करणाऱ्याचे असते. फोटोग्राफीचा व्यवसाय करताना बदलते तंत्रज्ञान आत्मसात करावे. स्वतःसह कुटुंबाचा आरोग्य विमा, उपकरणांचा विमा आणि आपण टिपलेल्या चित्रांचाही विमा, तसेच कॉपीराईट काढला पाहिजे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ‘रिस्पेक्ट फाउंडेशन’च्या माध्यमातून उपक्रम राबवले जात आहेत, याचा आनंद वाटतो.”
संभाजी भगत म्हणाले, “आपल्या सन्मानासाठी चळवळ उभारताना अनेकदा अडचणी येतात. मात्र, संयम आणि चिकाटीने त्याचा सामना करत चळवळ व्यापक करायला हवी. फोटोग्राफर उघड्या डोळ्यांनी समाजाचे चांगले-वाईट चित्रण करत असतो.”
सचिन भोर म्हणाले, शिक्षणातून सन्मान आणि समृद्धी या उद्देशाने फाउंडेशन काम करत आहे. वेडिंग फोटोग्राफर्सना सन्मान मिळावा, या भावनेतून या चळवळीची सुरुवात झाली. कोरोनाच्या काळात अनेक उपक्रम, कार्यशाळा घेण्यात आले.”
रंजन झिंगाडे यांनी फोटोग्राफी क्षेत्रातील अनुभव व वेडिंग फोटोग्राफीतील कलात्मकता या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. अभय काप्रे यांनी आपले मनोगत मांडले. सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले.