चांगल्या निर्माणासाठी परस्पर सहयोग महत्वपूर्ण

चांगल्या निर्माणासाठी परस्पर सहयोग महत्वपूर्ण

हबीब खान यांचे मत; ‘एईएसए'(AESA)तर्फे आर. बी. सूर्यवंशी, इकबाल चेनी यांना जीवनगौरव पुरस्कार

पुणे : “कोरोना महामारीचे संकट आणि ‘कॅशबेस’कडून कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे संक्रमण यामुळे अर्थव्यवस्था काहीशी मंदावली आहे. त्याचा परिणाम स्थापत्यशास्त्र, अभियांत्रिकी, सर्वेक्षण आणि इतर संबंधित व्यवसायांवर झाला आहे. हा व्यवसाय एकट्याने नाही, तर सहयोगातून करण्यावर भर देण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय मापदंडाचे चांगले निर्माण करण्यासाठी आपल्याला अशा समांतर व्यवसायांचा परस्पर सहयोग महत्वपूर्ण आहे,” असे मत कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर (सीओए)(COA) या भारत सरकारच्या वैधानिक संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट हबीब खान यांनी व्यक्त केले.

आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर असोसिएशनच्या (एईएसए)(AESA) वतीने २६ व्या ‘एईएसए पुरस्कार’ वितरण सोहळ्यात हबीब खान बोलत होते. एनडीए रोड येथील गार्डन कोर्टमध्ये झालेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ स्थापत्य अभियंता रावसाहेब उर्फ आर. बी. सूर्यवंशी आणि ज्येष्ठ आर्किटेक्ट इकबाल चेनी यांना ‘एईएसए जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी ‘एईएसए’चे अध्यक्ष पुष्कर कानविंदे, उपाध्यक्ष पराग लकडे, सचिव महेश बांगड, संयोजक विश्वास कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी उत्कृष्ट रचनांसाठी निवासी प्रकारातील ‘एईएसए एस जे कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड’ (सिंगल फॅमिली होम) आर्किटेक्ट आलोक कोठारी अँड टीमच्या ‘द ब्रिक अबोड, बिबवेवाडी या प्रकल्पाला प्रथम क्रमांक, तर आर्किटेक्ट प्रमोद दुबे अँड टीमच्या ‘सायला-गिफ्ट ऑफ गॉड’ आणि आर्किटेक्ट विकास अचलकर आणि मनोज तातूस्कर यांच्या ‘विलास जावडेकर पोर्टिया बाणेर’ प्रकल्पाला ज्युरी रिकमेंडेशन ‘अवॉर्ड’ देण्यात आला. अनिवासी प्रकारात ‘एईएसए बेहरे राठी अवॉर्ड’ (कमर्शियल) जगन्नाथ जाधव यांच्या नीलसॉफ्ट सेझ प्रोजेक्ट’ला, तर ज्युरी रिकमेंडेशन अवार्ड स्नेहा ठाकूर आणि अजय ताकवले यांच्या ‘संकेश्वर दर्शन पिंपरी’ (लँडस्केप) प्रकल्पाला मिळाला. पुण्याबाहेरील प्रकल्प मध्ये सौरभ मालपाणी यांच्या ‘अरण्यक-अंजनेरी शिवास, नाशिक’ प्रकल्पाला प्रथम, तर अजय सोनार व मोनाली पाटील यांच्या ‘विवेदा वेलनेस रिट्रीट, नाशिक’ला ज्युरी रिकमेंडेशन अवार्ड देण्यात आला.

हबीब खान म्हणाले, “आपला व्यवसाय बहुआयामी आणि वैविध्यपूर्ण होत आहे. वास्तुकलेविषयी किंवा वास्तुविशारद याविषयी लोकांमध्ये आणखी जागृती होणे गरजेचे आहे. कोणतेही बांधकाम उभे राहताना त्यात आर्किटेक्टची भूमिका महत्वाची असते. परंतु, त्याचे श्रेय अधिकतर अभियंता किंवा विकासकाला मिळते. ग्रामीण भागामध्ये आर्किटेक्ट पोहोचायला हवा. त्यासाठी ‘सीओए’ विविध उपक्रम राबवत असते. ग्रामीण भागातील घरांची उभारणी करताना आर्किटेक्टचा सहभाग वाढला पाहिजे. सूर्यवंशी आणि चाने यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन नवीन पिढीने आणखी चांगले काम उभारावे.”

आर. बी. सूर्यवंशी म्हणाले, “या संस्थेशी गेली ४० वर्षे संलग्न आहे. हबीब खान यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना आनंद वाटतोय. सहा दशकांच्या या व्यावसायिक प्रवासात मला अनेक समकालीन वास्तुविशारद व अभियंत्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. स्थापत्य बांधकाम क्षेत्रातील पितामह आणि माझे गुरु बी. जी. शिर्के यांचे या यशात मोलाचे योगदान आहे. प्रतिकूल परिस्थितीचे संधीत रूपांतर करण्याची शिकवण त्यांनी दिली. माझे सर्व सहकारी, कामगार आणि कुटुंबीय यांची साथ महत्वाची राहिली. बांधणी आणि निर्मिती यात फरक असतो. तरुण पिढीने तो समजून घेत सुंदर निर्मिती करण्यावर भर दिला पाहिजे.”

पुष्कर कानविंदे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. महेश बांगड यांनी सूत्रसंचालन केले. पराग लकडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *