विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
पुणे : “वसतिगृह ही युवा परिवर्तनाची केंद्रे आहेत, असा आदर्श विद्यार्थी साहाय्यक समितीने आपल्या कार्यातून घालून दिला आहे. निवास-भोजनासह विद्यार्थ्यांची जडणघडण केंद्रस्थानी ठेवणाऱ्या समितीचे वसतिगृह व्यवस्थापन ‘मॉडेल’ म्हणून राज्यभर नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. इतर वसतिगृहात समितीच्या वसतिगृह व्यवस्थापनाची कार्यप्रणाली राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी केले. जिद्द, चिकाटी, सातत्य, प्रामाणिकता आणि मूल्यांची जपणूक जीवनात महत्वाची असल्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या फर्ग्युसन रस्त्यावरील आपटे वसतिगृहात विशाल सोळंकी यांनी वसतिगृह व्यवस्थापन अभ्यासक्रम याबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. प्रसंगी विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त रमाकांत तांबोळी, सुप्रिया केळवकर, तुषार रंजनकर, रत्नाकर मते, दिनकर वैद्य, चंद्रकांत कुलकर्णी, प्रभाकर पाटील, ज्योती गोगटे, मनोज गायकवाड, विनया ठोंबरे, अरुण अत्रे, सुनील चोरे, कुंदन पाठारे आदी उपस्थित होते.
विशाल सोळंकी म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या विकासात समितीचा मोलाचा वाटा आहे. हे कार्य समाजातील इतर संस्थांनी आत्मसात केले पाहिजे. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत समितीसारख्या संस्थाचा लाभ पोहोचावा, यासाठी राज्य शासन व शिक्षण विभागामार्फत सहकार्य करण्याचा प्रयत्न आहे. वसतिगृह माणूस घडवणारी केंद्रे व्हावीत, त्याचे व्यवस्थापन सुसूत्र असावे, प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय देणारे आणि स्वावलंबी, चारित्र्यवान बनवणारे असावे, यासाठी लवकरच वसतिगृह व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरु करण्यात येईल. समितीच्या कार्यात माजी विद्यार्थी कणा बनून काम करताहेत, ही आनंदाची बाब आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालये किंवा संस्थांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला, तर शिक्षण व्यवस्था सक्षम होण्यास नक्की मदत होईल.”
“आपण प्रत्येकाने सतत नवनव्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. सकारात्मक विचार, नियोजनबद्ध अभ्यासावर भर देताना सातत्य टिकवून ठेवले पाहिजे. करिअरच्या प्रगतीसोबतच माणूस म्हणून आपली जडणघडण महत्वाची असते. त्यामुळे संस्कार, मूल्ये जपायला हवीत. स्वतःतील क्षमतांना ओळखून त्यानुसार करिअरच्या वाटा निवडण्याची गरज असते. काळ बदलतोय, तशा संधीही बदलत आहेत. नवे कौशल्य, तंत्रज्ञान आत्मसात करायला हवीत. तुमच्यातील प्रत्येकजण समितीचा चेहरा आहे. येथून चांगले संस्कार घेऊन बाहेर पडल्यानंतर आपल्या गावखेड्यात, कामाच्या ठिकाणी समितीसारखे कार्य उभारण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.”
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना सोळंकी यांनी मनमोकळी उत्तरे दिली. महेश सांगळे या विद्यार्थ्याने सूत्रसंचालन केले.