सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
पुणे : सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचा २४ वा वर्धापनदिन आणि स्व. बन्सीलालजी चोरडिया यांच्या १८ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दिला जाणारा ‘सुर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार-२०२२’ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, पदक व स्कार्फ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रीकल्चरच्या वतीने नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात ‘सुर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते गडकरी यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, आमदार प्रकाश आवाडे, ‘सूर्यदत्त’मधील रोशनी जैन, योगिता गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आणि नवीन अर्थसंकल्पीय दृष्टिकोनातून ‘महाराष्ट्राच्या विकासवाटा’ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमावेळी ‘सुर्यदत्त’च्या २४ व्या स्थापना दिवसाच्या पूर्वसंध्येला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सार्वजनिक सेवा क्षेत्रात त्यांनी केलेल्या अद्वितीय कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
नितीन गडकरी सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत म्हणाले की, शिक्षण ही एक मुलभूत आणि मौल्यवान संपत्ती आहे. तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाचा प्रवाह पोहोचला पाहिजे. त्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकाने प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक नागरिक सक्षम झाला पाहिजे. याकरिता सर्वच संस्थांनी प्रयत्न केला पाहिजे. आयातीपेक्षा निर्यात कसे वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे. या सर्वांकरिता दिशा ठरवून, योग्य मार्गाने, गांभीर्याने प्रयत्नशील राहण्याची गरज आहे.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “कल्पकता, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता, सर्वमान्य राजकारणी, वेगळ्या मार्गावरील समाजसेवक, भाजपाचे माजी अध्यक्ष म्हणून केलेले कार्य, धडाडीचे निर्णय घेत दररोज तयार होणारे १४ किमीहुन अधिकचे रस्ते, लेखक, उत्तम विरोधी पक्षनेता म्हणून कामगिरी, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तसेच बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर संकल्पना संपूर्ण भारतात राबविण्यासाह सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल नितीन गडकरी यांना सन्मानित करण्यात आले. ‘ब्रिजभूषण’ व ‘फ्लाय ओवर मॅन’च्या सत्काराने पुरस्काराची उंची वाढली आहे.” भावी पिढीसाठी त्यांचा आदर्श मोठा असून, त्यांची वाटचाल प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.
‘सूर्यदत्त’च्या वतीने वर्धापनदिनी भारतातील विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा सम्मान करण्यात येतो. मान्यवरांच्या कार्याचा सन्मान आणि त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थी, पालक, सहकारी व कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळण्याचा हा कार्यक्रमाचा उद्देश असतो, असे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनची स्थापना १९९९ मध्ये झाली. या २३ वर्षाच्या कालावधीत संस्थेने केजी ते पीजी अभ्यासक्रम, संशोधनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. केवळ देशातीलच नव्हे, तर परदेशातील विद्यार्थ्यांना संस्थेने शिक्षण प्रदान केले आहे. जागतिक विक्रम, विद्यार्थ्यांसाठी अभिनव शिष्यवृत्ती, सामाजिक भान, चांगला माणूस घडविण्यासाठी सर्वांगीण कल्याण, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, ग्रीन व डिजिटल संकुल परिसर, स्टार्टअप्स, बेस्ट कमवा व शिक्षा योजना आदी सूर्यदत्तची वैशिष्ट्ये आहेत.
सूर्यदत्त ही एकमेव संस्था आहे. जिथे ५०० हून अधिक आघाडीच्या व्यक्त्तिमत्वांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रतिभावंतांनी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांना प्रेरित केले आहे. आजवर राजयोगिनी दादी जानकी जी, राजयोगिनी दादी हृदय मोहिनी, पूज्य आचार्य चंदनाजी म. सा. आचार्य सम्राट डॉ. शिव मुनी, पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया, आचार्य डॉ. लोकश मुनीजी, पदमविभूषण डॉ. बी.के.एस. अय्यंगार, भारतरत्न डॉ भीमसेन जोशी, पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज, पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मविभूषण शशी कपूर, पद्मभूषण अनुपम खेर, पद्मश्री प्रतापराव पवार, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, श्याम अग्रवाल, पद्मभूषण शिव नादार, डॉ. डी. बी शेकटकर, पद्मश्री उज्जल निकम आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे.