पुणे : डॉ. अमोल कोल्हे हे एक नट आहेत आणि त्यांनी कोणती भूमिका करावी हा सर्वस्वी त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. मात्र महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे हा इतिहास आहे. भूतकाळ जर मानगुटीवर बसत असेल, तर त्याबद्दल विचार न केलेलाच बरा असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ यांच्या वतीने आणि गोखले कन्सट्रक्शन्सच्या सहकार्याने स्वारगेट येथील गणेशकला क्रीडा येथे १५ व्या वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या तिस-या दिवशी डॉ. समीरन वाळवेकर यांनी नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत घेतली त्यावेळी ते बोलत होते. लोकांच्या भावना आजकाल सारख्याच दुखावल्या जातात, असा टोलाही पाटेकर यांनी लगावला.
आपल्याला भारतरत्न हे जयंती पुण्यतिथीलाच आठवतात. आपण केवळ त्यांचे चबुतरे उभे केले आहेत. मात्र त्या चबुत-यांखाली गाडलेले त्यांचे विचार पुन्हा बाहेर काढले पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न धोंडे केशव कर्वे यांनी केलेले काम नतमस्तक होण्यासारखंच आहे. अशा प्रकारचे समाजकार्य करण्यासाठी भूकच असावी लागते, असे नाना पाटेकर म्हणाले.
ज्या व्यक्तीरेखा मला आवडल्या नाहीत त्या मी केल्या नाहीत, त्या केल्या असत्या तर झोप लागली नसती. तळमळत राहिलो असतो असे सांगत नाना पाटेकर म्हणाले, “खलनायकाच्या भूमिका करताना त्या संपूर्ण प्रोसेस मधून जाव लागतं, त्याचा त्रास होतो. माफीचा साक्षीदार चित्रपटातील जक्कल साकारताना मलाही त्रास झाला. ही भूमिका केल्याचा आनंद मला कधीच वाटला नाही.”
नटसम्राट नाटक न करता चित्रपट का केला असा प्रश्न विचारला असता नाना म्हणाले, “ज्यांनी ज्यांनी नटसम्राट नाटक केले ते गेले. ती भूमिका वठवण सोपं नाही, असे मला वाटते. डॉ. लागू व इतर कलाकारांनी त्या भूमिकेत अक्षरश: प्राण ओतले. ते मला जमले नसते. मी २५ प्रयोगही करू शकलो नसतो म्हणून चित्रपट करण्याचे ठरविले.” कोणतीही भूमिका करताना मी माझ्या प्रेमात पडलो नाही, म्हणून समोरच्या प्रेक्षकांवर भरभरून प्रेम करू शकलो, असेही नाना पाटेकर यांनी नमूद केले.
नाम फाउंडेशनच्या कामाविषयी बोलताना नाना म्हणाले, “मागील तीन वर्षांत अनेक नागरिकांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आणि सामान्य नागरिक अशा दोन्हींचा यामध्ये समावेश आहे. आज या सर्वांना मदतीची गरज आहे. त्यांना मदत करणे हे केवळ राजकारणी नाही तर आज आपल्या सर्वांचेच दायित्व आहे. ‘नाम’च्या वतीने आत्महत्याग्रस्त कुटुंबाला प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे आजवर १० कोटी ७० लाख रुपयांची मदत केली आहे,” कोणालाही मदत करताना कृपया फोटो काढू नका, अशी भावूक विनंतीही नाना पाटेकर यांनी उपस्थितांना केली.

 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                