‘वसुंधरा जिओ टेक्नॉलॉजी’ स्टार्टअपमुळे काम झाले सोपे
पुणे: एखाद्या परिसरात किती इमारती निर्माण झाल्या आहेत? कोणत्या भागात कोणती पिके लावली आहेत? विकासकामांसाठी सव्र्हें करायचा असल्यास त्या ठिकाणी किती झाडे, रस्ते, शेततळी आहेत? याची माहिती प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन शोधणे महामुश्कील काम. त्यासाठी मोठा वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. मात्र, वसुंघरा जिओ टेक्नॉलॉजीने हे काम अगदी चुटकीसरशी सोडवले आहे.
सॅटेलाइटवरून आलेल्या डेटाचे अॅडव्हान्स मशिन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) मदतीने विश्लेषण करून त्याआधारे जलद आणि अचूक डेटा हे स्टार्टअप तयार करते. मॅपिंग करण्यासाठी उपग्रह, एरियल प्लॅटफॉर्म, फिल्ड सेन्सर यावरून डेटा घेतला जातो. त्यानंतर त्याचे अल्गोरिदमच्या वापरातून विश्लेषण हे स्टार्टअप तयार करते. निरीक्षण करायच्या क्षेत्रात कोणते पीक किती प्रमाणात लावले आहे. पाणीपुरवठ्यासाठी निर्माण केलेल्या शेततळ्यांचा नेमका किती फायदा शेताला झाला, याशिवाय एखाद्या शहरात किती इमारती वाढल्या, तेथील रस्ते किती? यासह विविध प्रकारचे मॅपिंग या स्टार्टअपमुळे सोपे झाले आहे. शेतीतील अडचणींवर उपाय सुचविण्यासाठी हे स्टार्टअप महत्त्वाचे ठरत आहे.
शहरीकरण, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन आणि भारतीय सैन्य आणि संरक्षण क्षेत्रासाठीदेखील स्टार्टअपचे विश्लेषण परिणामकारक आहे. अद्वैत कुलकर्णी, आदित्य टेकाळे आणि राजेंद्र मनोहर हे तीन संचालक या स्टार्टअपचे नेतृत्व करीत आहेत. एरोस्पेस एव्हियोनिक्सचे शिक्षण घेऊन अद्वैत कुलकर्णी यांनी २०१७ मध्ये या स्टार्टअपची सुरुवात केली आहे.
…ही आहेत वैशिष्ट्ये
● तीन लाख ५५ हजार ७८२ स्क्वेअर किलोमीटरचे मॅपिंग ७५ हून अधिक प्रकल्प केले पूर्ण
● मोठ्यातील मोठ्या डेटाचे क्षणात विश्लेषण
● मशिन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर
● सर्व्हे करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाण्याची गरज नाही

 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                