पुणे : देशातील कंपनी सेक्रेटरीजची सर्वोच्च नियामक संस्था असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या (आयसीएसआय) अध्यक्षपदाची धुरा एका पुणेकराच्या हाती आली आहे. देवेंद्र देशपांडे यांची बुधवारी ‘आयसीएसआय’च्या अध्यक्षपदी निवड झाली. हा बहुमान मिळवणारे ते सहावे पुणेकर ठरले आहेत.
नूमवि शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या देशपांडे यांनी गरवारे कॉलेजमधून कॉमर्सची पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर १५ वर्षांहून अधिक काळ कंपनी सेक्रेटरी म्हणून स्वतंत्र व्यवसाय करणारे देशपांडे कॉर्पोरिट लॉज, फॉरेन एक्स्चेंज लॉज, कंपनी लॉज अंतर्गत ऑडिट, ऑडिट लॉज, सेक्रेटरियल ऑडिट आणि कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग आदीचे तज्ज्ञ मानले जातात. २०१३मध्ये देशपांडे ‘आयसीएसआय’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष झाले. हैदराबाद येथील सेंटर ऑफ एक्सलन्सचे अध्यक्ष आणि ‘आयसीएसआय’च्या आयटी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. अध्यक्षपदी विराजमान होण्यापूर्वी देशपांडे संस्थेचे उपाध्यक्ष होते, मनीष गुप्ता यांची संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे

 
                     
             
                                         
                                         
                                         
                                                 
                                                 
                                                