पुणे : आयुष्याचा टर्निंग पॉईंट असलेल्या दहावीच्या बोर्डाच्या जवळ आल्या आहेत. कोरोनाची परिस्थिती आणि दहावीचे वर्ष यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये दडपण आहे. अशावेळी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ युवा व सुपरमाईंड यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी “सक्सेस मंत्रा या विनामूल्य ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी युवाच्या अध्यक्षा तृप्ती नानल यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी सुपरमाईंडच्या संचालिका अर्चिता मडके, रोटरी क्लबचे श्रीकांत जोशी, दीपा बडवे उपस्थित होते.
अर्चिता मडके म्हणाल्या, “दहावी बोर्डाच्या परीक्षेला अवघे ७० दिवस उरले असून, या कमी वेळात लिखाणाचा सराव, परीक्षेची चांगली तयारी कशी करावी, यासाठी महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य मार्गदर्शन सत्र आयोजिले आहे. जानेवारी महिन्यातील दिनांक ८ व १५ या दोन शनिवारी अशा दोन सत्रात बोर्डातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. पूर्णत: विनामूल्य असलेल्या सत्राचे उद्घाटन शनिवार, दि. ८ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता झूम वेबिनारद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री.शरद गोसावी यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर गणित विषयाच्या एसएससी बोर्ड सदस्या डॉ. जयश्री अत्रे प्रमुख मार्गदर्शन करतील.”
तृप्ती नानल म्हणाल्या, “विद्यार्थी व पालकांना दडपणाशिवाय परीक्षेची तयारी करता यावी, यासाठी हे मार्गदर्शन सत्र उपयुक्त ठरेल. ऑफलाईन बोर्ड परीक्षेचे स्वरूप, गणितातील टेक्निक्स, कृतिपत्रिका सोडविण्याबद्दल मार्गदर्शन व वेळेचे नियोजन आदीबाबत मार्गदर्शन केले जाईल. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा. सहभागासाठी विनामूल्य नोंदणी https://bit.ly/3JKBnma या संकेतस्थळावर जाऊन करावी.”